Advertisement

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई

महापालिका सभागृहनेते पदाचे वारसदार म्हणून माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या तिघांची नावे चर्चेत आहे. त्यामुळे सभागृहनेते पदाच्या खुर्चीत बसण्यासाठी या तिन्ही महापौरांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. यांत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई
SHARES

महापालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव यांची वर्णी स्थायी समिती अध्यक्षपदी लागल्यानंतर या रिक्त जागेचा दावेदार कोण? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातच सभागृहनेते पदाचे वारसदार म्हणून माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य या तिघांची नावे चर्चेत आहे. त्यामुळे सभागृहनेते पदाच्या खुर्चीत बसण्यासाठी या तिन्ही महापौरांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. यांत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


उमेदवारी जाहीर

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी ५ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सभागृहनेते यशवंत जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यशवंत जाधव यांच्याबरोबरच शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर आणि सुधार समिती अध्यक्षपदासाठी दिलीप लांडे यांना उमेदवारी जाहीर झाली. या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज चिटणीस प्रकाश जेकटे यांना सादर केले. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्जच न भरल्याने या तिघांचीही बिनविरोध निवड झाली. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत याची घोषणा केली जाणार आहे.


कुणाची जास्त चर्चा

यशवंत जाधव यांची अपेक्षित अशी स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सभागृहनेतेपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. या खुर्चीचा दावेदार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. मात्र, या पदासाठी माजी महापौर श्रध्दा जाधव, विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य यांची तिघांची नावे चर्चेत आहे. सभागृहनेतेपदाचे दावेदार असलेले मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांची वर्णी समिती अध्यक्षपदी लागल्यामुळे ६ वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका व माजी महापौर श्रद्धा जाधव यांचं नाव चर्चेत आहे. परंतु श्रद्धा जाधव या स्थायी समिती सदस्य नाहीत. त्यातुलनेत विशाखा राऊत आणि मिलिंद वैद्य हे दोन्ही स्थायी समितीचे सदस्य आहेत.


कुणाला सर्वाधिक पसंती?

मात्र, शिवसेनेच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार विशाखा राऊत यांचं नाव या पदासाठी विचारात असल्याचं समजते. श्रद्धा जाधव आणि मिलिंद वैद्य यांच्या तुलनेत विशाखा राऊत यांच्या नावाला अधिक पसंती असल्याचंही समजतं. त्यामुळे विशाखा राऊत यांचं नाव या पदासाठी निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु सभागृहातील संसदीय कामकाज सांभाळण्याची हातोटी आणि वक्तृत्व यात श्रद्धा जाधव उजव्या ठरत आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्याही नावाचा विचार होत असल्याचं समजतं.


पुन्हा गनिमी कावा?

सातमकर आणि चेंबूरकर यांना तडकाफडकी स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे द्यायला लावल्यानंतर त्यातील एका रिक्त जागेवर माजी महापौर मिलिंद वैद्य यांची वर्णी लागली होती. त्यामुळे वैद्य हे आजही मातोश्रीच्या जवळ असल्यामुळे या दोन्ही महिलांच्या पुढे जावून या पदावर जावून विराजमान होऊ शकतात, असंही म्हटलं जात आहे. वैद्य यांनी आपल्या महापौरपदाच्यावेळी जो गमिनी कावा वापरुन हे पद मिळवलं होतं, त्याच गनिमी काव्याचा वापर करून ते सभागृहनेतेपद मिळवू शकतील,असेही बोलले जात आहे. सध्या शिवसेना पक्षप्रमुख हे परदेशात गेले असून त्यांनी जाताना कुणाच्या नावासमोर सभागृहनेतेपदाचं ताट वाढून ठेवले आहे, हे येत्या ८ एप्रिलपर्यंत स्पष्ट होणार आहे.


सेवा ज्येष्ठता तारणार?

श्रद्धा जाधव या ६ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. सन ऑक्टोबर २०१० पासून ते फेब्रुवारी २०१२पर्यंत त्या महापौर होत्या. परंतु महापौर झाल्यामुळे सन २०१२ ते २०१७ या कालावधीत त्यांना एकही पद देण्यात आलं नव्हतं. त्यातुलनेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या माजी महापौर विशाखा राऊत यांना सुधार समिती सदस्य बनवतानाच स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षपद दिलं. तर मिलिंद वैद्य यांना जी-उत्तर प्रभाग समितीचं अध्यक्षपद बहाल केलं.



हेही वाचा-

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर यशवंत जाधव बसणार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा