भांडुपच्या पोटनिवडणुकीतील पराभवाने शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित


SHARE

भांडुप येथील प्रभाग क्रमांक ११६च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षी पाटील यांना दारुण पराभव पत्कारावा लागला. विद्यमान आमदारांची पत्नी आणि नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मिनाक्षी पाटील यांना पराभवाचे पाणी पाजून स्वर्गीय प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांनी बाजी मारली आणि भाजपाचे कमळ भांडुपमध्ये उगवले. आजवर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा कधीही पराभव झाला नव्हता. मात्र, या पोटनिवडणुकीच्या पराभवामुळे आजवरच्या शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित झाली आहे.

भाजपाने प्रचारात शिवसेनेला केले नामोहरम

काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्या रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पुन्हा शिवसेनेने पराभूत उमेदवार मिनाक्षी पाटील यांना उमेदवारी  दिली. मात्र, काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणाऱ्या प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश केला. यामध्ये प्रतिक पाटील यांची पत्नी जागृती यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्याचा चंग बांधला होता. यासाठी भाजपाचे मनोज कोटक यांच्यासह खासदार किरीट सोमय्या आणि कौशिक पाटील यांनी प्रचारात शिवसेनेला नामोहरम केले होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी मनोज कोटक यांनी मुलुंड सोडून भांडुपमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे हा विजय भाजपासह कोटकांचाही मानला जात आहे.

भांडुपमध्ये शिवसेना शांत, भाजपाचीच राडेबाजी

भांडुप हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधातील चिड काँग्रेसच्या हातावर उमटून प्रमिला पाटील या विजयी झाल्या होत्या. मात्र, या पोटनिवडणुकीतही पुन्हा एकदा अशोक पाटील यांच्याविरोधातील चिड मतपेटीतून मतदारांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी अशोक पाटील हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवायचे. परंतु याच अशोक पाटलांना भाजपाने पुन्हा एकदा अस्मान दाखवले. शिवसेना म्हणजे राडेबाजी असे  अनेक वर्षांपासून आपण ऐकत होतो. परंतु या पोटनिवडणुकीत भाजपाने राडेबाजी केली आणि शिवसेनेची लोक शेपूट घातल्यासारखी बसून होती. त्यामुळे भांडुपमधील शिवसैनिक शांत झाले का?शिवसेनेचे अस्तित्वच संपले का असा प्रश्न आता या निकालाने मुंबईकरांना पडला आहे. ही निवडणूक कोकणातील आहे काय असाच सवाल भांडुपकरांना पडला होता. प्रचारातील राडेबाजीतच भाजपाने ही सिट जिंकली.

नगरसेवकपदाचे खाते उघडले होते पोटनिवडणुकीत

शिवसेनेनेे नगरसेवक पदाचे पहिले खाते हे पोटनिवडणुकीत उघडले होते. त्यानंतर झालेल्या मुंबईतील प्रत्येक पोटनिवडणुकीत शिवसेनेचेच उमेदवार निवडून यायचे. पोटनिवडणूक म्हटली की मुंबईतील शिवसेनेची सर्व फौज तिथे कामाला लावून प्रत्येक बुथची जबाबदारी ही एकेका नगरसेवकांवर सोपवली जायची. त्याचप्रमाणे भांडुपच्या निवडणुकीतही शिवसेनेने खासदार, आमदार, सर्व नगरसेवक कामाला जुंपवूनही अखेर पराभवच पदरात पडला. जागृती पाटील यांचा विजय हा सहानभूती आणि भाजपा तसेच वैयक्तीक पाटील कुटुंबांची ओळख या तीन पैलूवर झालेला आहे. वांद्रे विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करून शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. त्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत अनिल पाटणकर यांनी  शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यातही त्यात अनिल पाटणकर हे विजयी झाले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत.

सध्या तरी ३ नगरसेवकांचा फरक

मात्र, या पराभवामुळे शिवसेनेचे नुकसान झालेले नसले तरी एका नगरसेवकांची संख्या वाढवण्याची संधी गमावली. महापालिकेत शिवसेनेचे ८४ नगरसेवक असून ४ अपक्षांसह त्यांचे संख्याबळ ८८ एवढे आहे. यातील चंगेझ मुलतानी या एका अपक्षाचे महापालिका सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांचे संख्याबळ ८७ एवढे आहे. तर भाजपाचे एकूण ८२ सदस्य असून दोन अपक्षांच्या मदतीने त्यांचे संख्याबळ ८४वर पोहोचले आहे. परंतु यापैकी शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे त्यांची सदस्य संख्या ८३वर आली आहे. पण जागृती पाटील यांच्या विजयामुळे पुन्हा ८४ एवढी झाली आहे. त्यामुळे तीन नगरसेवकांचा फरक असून सध्या तरी भाजपाने कोणताही डाव खेळण्याचा मनस्थितीत दिसत नाही.

वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजपा घेणार?

आजवर पोटनिवडणुकीत जी खेळी शिवसेना खेळत होती, तीच खेळी भाजपाने खेळत हा विजय सुकर केला. ज्या राडेबाजी आणि गुंड प्रवृतीचा आधार घेत शिवसेना भांडुपमध्ये आपले अस्तित्व टिकवून होती, त्याच गुंड प्रवृतीचा आधार घेत भाजपाने आपली ताकद भांडुपमध्ये वाढवून घेतली आहे. त्यामुळे ही एक जागा आज जरी शिवसेनेला डॅमेज फॅक्टर वाटत नसली तरी येत्या सहा महिन्यात जेव्हा शैलजा गिरकर यांच्या प्रभागात पोटनिवडणूक होईल. त्यात जर भाजपाची संख्या वाढली तर तेथून भाजपाच्या पुढील महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाजपाने  या विजयाचे पेढे वाटले असले तरी पुढील काही महिन्यांमध्ये सत्तेची समिकरणे बदलून समित्यांचे अध्यक्षपद आपल्या हाती खेचून घेण्यात ते यशस्वी ठरतील. महापौर पदाचा कालावधी हा अडीच वर्षांचा असल्यामुळे त्या पदावर कोणताही दावा न ठोकता, ते मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत ते भाजपाची मोहोर उमटवून  आपल्याकडे सर्वाधिक सत्तेच्या चाव्या घेणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


संबंधित विषय