Advertisement

विशाखा राऊत यांची महापालिका सभागृह नेतेपदी निवड

महापालिका सभागृह नेतेपदी आमदारपद आणि महापौरपद भूषवलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

विशाखा राऊत यांची महापालिका सभागृह नेतेपदी निवड
SHARES

मुंबई महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कोण बसणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर बुधवारी मिळालं. महापालिका सभागृह नेतेपदी आमदारपद आणि महापौरपद भूषवलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार पारिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा केली. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर सदस्य असलेल्या विशाखा राऊत यांची सभागृह नेतेपदी निवड झाल्याने एकप्रकारे सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळाला, असं म्हणता येईल.


उल्लेखनीय कारकिर्द

विशाखा राऊत या सर्व प्रथम १९९२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९९७ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यावर पहिल्याच वर्षी महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर दादरमधून आमदार म्हणून त्या निवडून आल्या. त्यानंतर त्या शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून कार्यरत होत्या.


महापालिकेतून पुन्हा भरारी

दरम्यान काही काळ पक्षीय राजकारणापासून अलिप्त होत्या. परंतु २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागांची रचना झाल्यानंतर प्रभाग १९१ मधून महिला उमेदवाराचा शोध सुरू असताना विशाखा राऊत यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. मनसेचे संदीप देशपांडे यांच्या पत्नी समोर लढत देण्यासाठी शिवसेनेने विशाखा राऊत यांचं नाव निश्चित केलं आणि त्या निवडूनही आल्या.


तगड्या प्रतिस्पर्धकांवर मात

नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर सभागृह नेतेपदासाठी विशाखा राऊत यांचं नाव स्पर्धेत होतं. पण या पदावर यशवंत जाधव यांचं नाव निश्चित झालं. त्यामुळे स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. त्यानंतर त्यांची आता स्थायी समिती सदस्यपदीही निवड झाली आहे.


दालनात केली घोषणा

विशाखा राऊत यांच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी महापालिका सभागृहात होणं अपेक्षित होते. परंतु तिथे घोषणा न करता महापौरांनी सभागृह संपल्यावर आपल्या दालनात पत्रकार परिषद घेऊन विशाखा राऊत यांनी शिवसेना महापालिका गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केलं. त्यामुळे त्याची अधिकृत घोषणा येत्या १० एप्रिलच्या महापालिका सभागृहात केली जाणार आहे.



हेही वाचा-

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर यशवंत जाधव बसणार!

शिवसेनेला उपसभापतीपदाचं आमिष, संजय राऊतांच्या नावाची चर्चा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा