
पालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) (BMC) कडून शिवडी येथे पाइपलाईनचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे 22 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 23 एप्रिल पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईतील दक्षिण आणि मध्य भागात 18 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कामांतर्गत भांडारवाडा टेकडी जलाशयाशी जोडलेल्या बोगदा पाइपलाईनवर 1,500 मिमी क्षमतेचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवले जाणार आहेत. यामुळे शहरातील विविध जलाशयांमध्ये पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
या कालावधीत A, B, C आणि F दक्षिण विभागांतील अनेक भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. E विभागातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
A विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) परिसर, शासकीय कार्यालये आणि महत्त्वाच्या संस्थांमध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद राहील. B विभागात डोंगरी, मस्जिद बंदर आणि आसपासच्या भागात दोन्ही दिवशी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. C विभागातील काही बाजारपेठा आणि निवासी भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल.
E विभागातील भायखळा, नागपाडा, अॅग्रिपाडा आणि काळाचौकी येथे गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. मात्र मझगाव, डॉकयार्ड रोड आणि बंदर परिसरात बुधवारी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
रुग्णालयांवरही या बंदचा परिणाम होणार आहे. जे.जे हॉस्पीटल (Sir JJ Hospital), कस्तुरबा हॉस्पीटल (Kasturba Hospital) आणि नायर हॉस्पीटल (Nair Hospital) यांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.
F दक्षिण विभागातील शिवडी, वडाळा पूर्व आणि अभ्युदय नगर येथे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. तर लालबाग, परळ आणि दादर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच केइएम हॉस्पीटल (KEM Hospital), टाटा मेमोरीयल हॉस्पीटल (Tata Memorial Hospital), Jerbai Wadia Hospital आणि एमजीएम हॉस्पीटल (MGM Hospital) यांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.
दरम्यान, नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे, जपून वापर करावा तसेच पुढील काही दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचे आवाहन BMCने केले आहे.
हेही वाचा
