महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर विकासकांबद्दल असलेले गैरसमज मोठ्या प्रमाणात दूर झाल्याचा दावा नरेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. काही मुठभर व्यक्तींमुळे सर्व विकासक बदनाम झाले होते.

घरांचा ताबा विकासक जाणीवपूर्वक वेळेवर देत नाही, असा विकासकांबद्दल मोठा गैरसमज आहे. परंतु त्यामागे अनेक कारणे असतात. मात्र महारेराच्या स्थापनेनंतर पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याने घरखरेदीदारांमध्येही विश्वास निर्माण झाला, असा दावाही डॉ. हिरानंदानी यांनी केला.

इमारतविषयक परवानग्या देणारी सर्व नियोजन प्राधिकरणे महारेराच्या अखत्यारित यायला हवीत, अशी मागणी नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी केली. विकासकांनीही आपली क्षमता पाहूनच प्रकल्प हाती घ्यावेत आणि ते पूर्ण करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कृत्रिम बुद्घिमत्तेचा सावधपणे वापर करून बांधकामात वैविध्यता आणताना अधिकाधिक परवडणारी घरे निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत (mumbai) पहिल्यांदा ट्रम्प टॉवर उभारणाऱ्या ट्रीबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी आता ट्रम्प टॉवर मुंबई महानगर परिसरातही येणार असल्याचे यावेळी सांगितले. सध्या स्टुडिओ अपार्टमेंटला जोरदार मागणी असून भविष्यात ही मागणी आणखी वाढेल, असा दावाही मेहता यांनी केला.



हेही वाचा

राज्य बाल हक्क आयोग: राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करा

ठाण्यात वृक्ष, फुले आणि जैवविविधतेच्या प्रदर्शनाचे आयोजन