वडाळ्यात मोकाट गायींचा रास्ता रोको

 wadala
वडाळ्यात मोकाट गायींचा रास्ता रोको
wadala, Mumbai  -  

देशभरात गोरक्षकांची लाट आलेली असताना वड्याळात मात्र खुद्द गोमाता भर रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना दिसत आहेत. वडाळा पूर्वेकडील शांतीनगर परिसरातील पूर्व मुक्त मार्गाखालील रस्त्यावर मोकाट गायींचा वावर वाढला आहे. या गायी रस्त्यातच ठाण मांडून बसल्याने सॉल्ट पॅन पूर्व मुक्त मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांना सतत ब्रेक लावावे लागत आहेत. परिणामी, येथे छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली असून वाहतूक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

लालजी, मोटू, ललन, विजय हे चौघे या विभागात मोकाट फिरणाऱ्या गायींचे मालक आहेत. त्यांनी पालिकेच्या जागेत अनधिकृतरीत्या चार-पाच गोठे बांधून दुधाचा व्यवसाय भर रस्त्यातच थाटला आहे. या गोठ्यांमुळे शांतीनगर परिसरात घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांवर नाक-तोंड बंद करून प्रवास करण्याची वेळ आली आहे. या मालकांच्या दहशतीपोटी सहसा कुणीही त्यांच्या भांडगडीत पडत नाहीत, याबाबत अनेकदा महापालिकेच्या एफ उत्तर विभागात तक्रार केली असली तरी महापालिका अधिकारी याकडे डोळेझाक करत आहे.

- प्रशांत मोरे, रहिवासी, शांतीनगर

या अनधिकृत गोठ्यांमध्ये सुमारे 50 च्या आसपास गायी असून त्यांच्या पोषणावर खर्च करण्याऐवजी हे मालक या गायींना सकाळी चरायला सोडून देतात. दिवसभर या गायी कचराकुंडीतील घाण तसेच मुक्त मार्गाच्या कडेला पडलेला पालापाचोळा खाऊन रस्त्यावर ठाण मांडतात. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूककोंडी होते. याशिवाय भरधाव वाहनांच्या धडकेत अनेक गायी जखमी झाल्या आहेत. या मोकाट गायींमुळे मुक्त मार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असेही मोरे म्हणाले.

पूर्व मुक्त मार्गावर मोकाट फिरणाऱ्या गायींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. यापूर्वी अनेकदा या गायींच्या मालकांवर कारवाई करून दंड ठोठावण्यात आला आहे.

- दत्तात्रय सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वडाळा

Loading Comments