Advertisement

आता पानाच्या पिचकाऱ्यांचे डाग निघणार सहज, रुईयाच्या विद्यार्थिनींचं यशस्वी संशोधन


आता पानाच्या पिचकाऱ्यांचे डाग निघणार सहज, रुईयाच्या विद्यार्थिनींचं यशस्वी संशोधन
SHARES

पान खाऊन थुंकल्यानं ऐतिहासिक स्थळं, स्मारक, रेल्वे स्थानकासर इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हे डाग स्वच्छ करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं. मात्र आता स्वस्तात आणि पर्यावरणपूरक मार्गाने हे डाग स्वच्छ करण्याचा मार्ग माटुंगा येथील रुईया कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शोधून काढला आहे. अमेरिकेमधील बोस्टनस्थित मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)तर्फे घेण्यात आलेल्या जागतिक संशोधन स्पर्धेत रुईया कॉलेजच्या प्रकल्पाने सुवर्ण पदक पटकावलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थिनींचं विशेष कौतुक केलं आहे.


या प्रकल्पाला विशेष पारितोषिक

एमआयटी विद्यापीठातर्फे दरवर्षी 'इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनीअर्ड मॅकेनिज' ही जागतिक संशोधन स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी जगातील उच्च दर्जाचे काही मोजके संशोधन प्रकल्प निवडले जातात. यंदाच्या या स्पर्धेसाठी जगभरातून तीनशेहून अधिक संघ सहभागी झाले होते. दरम्यान रुईयाच्या प्रकल्पाला बेस्ट इंटिग्रेटेड ह्युमन प्रॅक्टिसेससाठीचे विशेष पारितोषिकही देण्यात आलं असून या संघाचे बेस्ट प्रोजेक्ट अंडर एन्व्हायरन्मेंट ट्रॅक आणि बेस्ट प्रेझेंटेशन या अन्य दोन विशेष पारितोषिकांसाठीही नामांकन झालं आहे.


आठ विद्यार्थिनींचा सहभाग

रुईयाच्या या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पात सहभागींमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आंबरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. रुईयाच्या या आठ विद्यार्थिनींच्या ग्रुपला डॉ. अनुश्री लोकुर, डॉ. मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुलकर्णी यांचंही मार्गदर्शन लाभलं आहे.


अशी सुचली कल्पना

सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या लोकांची संख्या कित्येक पटीनं वाढली आहे. त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक वास्तूंचे सौंदर्यही नष्ट होत असल्यानं या ठिकाणीचं सौंदर्य टिकवण्यासाठी उपनगरीय रेल्वेला डब्यांमधील डाग नष्ट करण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे हे डाग नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असलं तरीही हे डाग पूर्णपणे निघत नाहीत. त्यामुळे या समस्येवर जैविक संश्लेषणाच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना डॉ. मयुरी रेगे यांनी मांडली.


प्रकल्पासाठी 'या' घटकांचा वापर

पानाच्या डागाचा लाल रंग सुरक्षित रंगहीन पदार्थात परिवर्तित करणाऱ्या सुक्ष्मजीवांचा (मायक्रोब्स) आणि विकर (एन्झायम्सचा) या घटकांचा वापर या प्रकल्पात केला आहे. पान विक्रेते, स्थानकांचे व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, सफाई कामगार आणि सफाईचे काम करणाऱ्या संस्था यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही या घटकांच्या निर्मितीत अवलंब केला आहे. त्याशिवाय हा उपाय स्वस्त असावा असा प्रयत्न डॉ. मयुरी यांनी केला आहे.


'या'पासून घेतली प्रेरणा 

रुईयाच्या विद्यर्थिनींनी तयार केलेला हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियाना' पासून प्रेरणा घेऊन साकारला असून हा प्रकल्प परीक्षकांच्याही विशेष प्रशंसेला पात्र ठरला आहे. यात रुईयाच्या युवा संशोधक विद्यार्थिनींनी कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवण्याची चमकदार कामगिरी केली आहे. या संपूर्ण ग्रुपचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन अभिनंदन केल असून त्यांना प्रमाणपत्र वितरित केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा