Advertisement

बायोमेट्रिक हजेरीला डॉक्टरांचाही ठेंगा


बायोमेट्रिक हजेरीला डॉक्टरांचाही ठेंगा
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमच्या माध्यमातून ई मस्टर अर्थात संगणकीय हजेरी नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या बायोमेट्रिक हजेरीबाबत चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी विरोध दर्शवलेला असतानाच महापालिकेतील डॉक्टरांनीही ही बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास असमर्थता दर्शवली आहे. रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांसह डॉक्टर मंडळींपैकी सुमारे ३७ टक्के डॉक्टर या बायोमेट्रिक हजेरीचा अवलंब करत नसल्याचा माहिती समोर आली आहे.


मस्टरवरील स्वाक्षरीऐवजी बायोमेट्रिक हजेरी

मुंबई महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी  हो नोंदवहीत (मस्टर बूक) नोंदवली जाते. परंतु, या सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी बायोमेट्रीक अटेंडन्स सिस्टिमद्वारे ऑनलाईन नोंद करून आधार कार्डशी लिंकअप केली गेली आहे. त्यामुळे, ही सर्व नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या जुलैपासून कर्मचाऱ्यांची हजेरीही बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवली जात आहे. यापूर्वी केल्या जाणाऱ्या स्वाक्षरीऐवजी संगणकावर आपल्या हाताच्या ठशाद्वारे ही हजेरी नोंदवली जात आहे.


प्रणालीचा बोजवारा

महापालिका प्रशासनाने जुलैपासून या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला असला तरी इंटरनेट सेवा सक्षम नसल्यामुळे तसेच अधूनमधून ती बंद असल्यामुळे बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्यास कर्मचाऱ्यांना विलंब होत आहे. तसेच, एकाच वेळी सर्व कर्मचारी निघत असल्यामुळे तांत्रिक कारणामुळे हजेरी नोंदवण्यास विलंब होऊन गोंधळ उडताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांकडून या प्रणालीचा अवलंब होत असला तरी प्रत्यक्षात तांत्रिक कारणाने होणाऱ्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने इंटरनेट सेवा चांगल्याप्रकारे केल्यास हजेरी नोंदवण्याची प्रक्रिया जलदगतीने होईल, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, या बायोमेट्रिकच्या मशिन्सची संख्याही कमी असल्यामुळे वेळेचे गणित साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आजूबाजूच्या विभागांमध्ये धावाधाव करून हजेरी नोंदवावी लागत आहे.




महापालिकेत ८५ टक्के कामगार, कर्मचाऱ्यांकडून वापर

मुंबई महापालिकेच्या ८० हजार कर्मचाऱ्यांनी शनिवारी बायोमेट्रिकद्वारे हजेरी  नोंदवली आहे. महापालिकेचे एकूण १ लाख ३ हजार कर्मचारी असून त्यातील १० टक्के कर्मचारी गैरहजर राहतात. त्यामुळे, जे काही ९३ हजार कर्मचारी दरदिवशी सेवेत रुजू होतात. त्यापैकी, ८० हजार कर्मचारी म्हणजेच सरासरी ८५ टक्के कर्मचारी हे याद्वारे हजेरी नोंदवत असल्याची माहिती सामान्य विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. जे कोणी याबाबत विरोध करत आहेत, ते सर्व कामचुकार आहेत आणि त्यांच्यासाठी यात वेगळा बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


कामचुकार कर्मचाऱ्यांचाच विरोध

बायोमेट्रिक हजेरीला सफाई कामगारांकडून विरोध होत आहे. परंतु, त्यांच्यापैकीही काही कामगार याद्वारे हजेरी नोंदवत आहेत. पण, या सफाई कामगारांसोबतच महापालिकेच्या प्रमुख रुग्णालय व उपनगरीय रुग्णालयांमधील डॉक्टरांकडूनही हजेरी नोंदवण्यास टाळाटाळ होत आहे. रुग्णालयातील केवळ ६३ टक्केच डॉक्टर हे आजघडीला बायोमेट्रिक हजेरी नोंदवत आहेत. तर, ३७ टक्के डॉक्टरांनी या हजेरीचा अवलंब केला नसल्याची खंत सुधीर नाईक यांनी व्यक्त केली. सहाव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता (डिए) देण्याचे म्हटले आहे. परंतु, त्याबरोबरच बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असेही नमूद केले आहे. त्यामुळे, जर डीए पाहिजे असेल तर बायोमेट्रिक हजेरी नोंदवलीच पाहिजे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. १५ टक्के कामचुकार कर्मचाऱ्यांकडूनच ही टाळाटाळ होत असून यांनी जर याचा अवलंब न केल्यास त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही संकेत त्यांनी दिले.


अद्यापही पगाराच्या पत्रकाला हजेरीची लिंक नाही!

सध्या महापालिकेच्या मुख्यालयासह २४ विभाग कार्यालये आणि इतर महापालिका कार्यालयांमध्ये सुमारे ३५०० बायोमेट्रिक हजेरी मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. या मशीन्सद्वारे सध्या हजेरी नोंदवली जात आहेत. परंतु, या हजेरीशी पगाराचे पत्रक लिंक केलेले नाही. आज जे कर्मचारी मस्टरवर स्वाक्षरी करत आहेत, त्या मस्टरऐवजी या सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवायची आहे. त्यामुळे, जे काही तांत्रिक मुद्दे आणि विरोध समोर येत आहेत, त्यांचे निराकारण झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक लिंक केले जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले.


तर, स्मशानात जावून हजेरी नोंदवा...

मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागाच्यावतीने सर्व समित्यांचे अजेंडा हे नगरसेवकांच्या घरी पाठवले जाते. त्यामुळे समित्यांच्या या कार्यक्रम पत्रिकांचा बटवडा करण्यासाठी चिटणीस विभागातील शिपायांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. रात्री उशिरापर्यंत नगरसेवकांच्या घरी जावून पत्रिकांचा बटवडा केल्यानंतर डयुटी संपल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी कुठे नोंदवायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु, याबाबत चिटणीस विभागाच्या आस्थापना विभागाने रात्री अपरात्री डयुटी संपल्यानंतर कुठल्याही चौकीत नाही तर स्मशानभूमीत जावून हजेरी नोंदवा, असे सांगत अवहेलना केली. त्यामुळे, चिटणीस विभागातील शिपायांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. चिटणीस प्रकाश जेकटे यांनी यात मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. याची दखल खुद्द उपायुक्त सुधीर नाईक यांनी घेऊन शिपायांचा मुद्दा योग्य असल्याचे सांगत याबाबत शिपायांनी मस्टरप्रमाणेच बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पुढील कामाला निघावे. त्यामुळे ज्याप्रमाणे आधी त्यांचा ओव्हरटाईम मेंटेंन केला जात होता, तसाच मेंटेंन केला जाईल, असे सांगत बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असे आवाहन केले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा