...तर महापालिका कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही !

 BMC
...तर महापालिका कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही !

मुंबई - आजवर हजेरी वहीत स्वाक्षरी घेऊन हजेरी नोंदवणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमच्या माध्यमातून इ-हजेरी नोंदवली जाणार आहे. येत्या 15 एप्रिलपासून 'इ हजेरी'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून याची अंतिम मुदत 15 मार्चला संपुष्टात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांना मे महिन्यापासूनचा पगारच आता मिळणार नाहीये.

हजेरी लावून कामावरून पळ काढणाऱ्या कामगारांना महापालिका प्रशासनाने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करून बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मागील दोन महिन्यांपासून बायोमेट्रिक हजेरीसाठी ऑनलाईन नोंदणी करून आधार कार्डशी लिंकअप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

बायोमेट्रीक हजेरीची अंमलबजावणी 15 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. यासाठी 15 मार्चपर्यंत ही नोंदणी करणे आवश्यक होते. परंतु नोंदणी करण्याची मुदत संपली तरी महापालिकेच्या एकूण 1 लाख 07 हजार कामगार - कर्मचाऱ्यांपैकी 50 हजार कामगार आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारपर्यंत आपली नोंदणी केली होती. मात्र, या नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी 39,071 कारभारी अॅक्टिव्ह झाले आहेत. उर्वरित नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी विविध कारणांमुळे रद्द करून पुन्हा सुधारीत करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. 

"येत्या १५ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचना महापलिकेच्या 24 विभाग कार्यालयांसह 70 विभागांना देण्यात आल्यात. नोंदणी करण्याची मुदत संपली असली तरीही कर्मचाऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी त्वरित करावी. परंतु त्यांनी जर ही नोंदणी न केल्यास त्यांना मे महिन्यातला पगार मिळणार नाही," असे सामान्य प्रशासनाचे उपयुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.

15 एप्रिलच्या दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्वावर बायोमेट्रिक मशीन बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या विधी विभाग, आयुक्त कार्यालय आणि महापालिका चिटणीस या विभागाची प्राथमिक अंमलबजावणी सुरू झाली आहे. या तिन्ही विभागांमध्ये 49 मशीन बसवण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत 883 कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नोंदवली गेली आहे.

महापालिकेचे कारभारी कुठे करणार ऑनलाईन नोंदणी?

महापलिकेच्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन नोंदणी mhmcgm.attendance.gov.in. या संकेत स्थळावर करता येणार आहे. नोंदणी करताना आधार कार्ड क्रमांकासह मेल आयडी, मोबाईल नंबर आदींची माहिती नमूद करायची आहे.

कशी होणार बायोमेट्रिक हजेरी?

महापालिका विभागांना बायोमेट्रिक मशीन खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला हजेरी नोंदवताना आधार कार्ड क्रमांक नोंद करून त्यानंतरच आपला अंगठा मशीनवर लावावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना आणि जाताना ही प्रकिया पूर्ण करावी लागणार आहे.

Loading Comments