Advertisement

खोट्या अभिरुचीचा खोटा आधार : टीआरपी!

आपण आताच शिंकलो म्हणजे आपल्याला सर्दीच्या औषधांच्या जाहिराती दाखवल्या पाहिजेत हे ठरवण्याइतकं डिजिटल तंत्रज्ञान पुढे गेलेलं असताना थेट प्रत्येक टीव्हीवर काय पाहिलं जातंय याचा रिअल टाइम डेटा मिळवणं सहजशक्य आहे.

खोट्या अभिरुचीचा खोटा आधार : टीआरपी!
SHARES

अमेरिकेत एक गोष्ट सांगतात… थोडी धक्कादायक आणि प्रक्षोभक आहे, योग्य ती खबरदारी घेऊन वाचा…

…अमेरिकेतल्या एका १५ वर्षांच्या मुलीच्या वडिलांना अचानक मोबाइलवर, लॅपटाॅपवर, घरी, आॅफिसात सगळीकडे सर्व इंटरफेसेसवर अर्भकांसाठीचे खास कपडे, डायपर वगैरे गोष्टींच्या जाहिराती दिसू लागल्या… हे गृहस्थ स्वत: आयटी क्षेत्रात होते, त्यामुळे त्यांना आपण काही सर्च केल्यावर त्या वस्तू किंवा विषयाच्या संदर्भातल्या जाहिराती कशा ठिकठिकाणी दिसायला लागतात याची उत्तम कल्पना होती… त्यामुळेच ते चक्रावले आणि त्यांनी योग्य ठिकाणी चौकशी केली…

…त्यांना सांगितलं गेलं की तुमची १५ वर्षांची मुलगी दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन्सचं पाकीट खरेदी करते. तिने गेले चार महिने ती पाकिटं खरेदी केलेली नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे बाळाच्या आगमनाची तयारी सुरू असणार, हे लक्षात घेऊन आमच्या अल्गोरिदमने तुम्हाला या जाहिराती दाखवायला सुरुवात केली आहे…

…त्या बापाला केवढा प्रचंड धक्का बसला असेल, विचार करा…

…वेट अ मिनिट, ही कथा भारी आहे, पण तिचा टीआरपीशी काय संबंध आहे?

कळेल कळेल, धीर धरा… आपल्या लाडक्या वृत्तवाहिनीच्या अँकरसारखे उतावीळ होऊ नका…

…ही उपरोल्लेखित कथा पहिल्यांदा ऐकण्यात-वाचनात आली तेव्हा भारतात मोबाइल्सचं सरसकटीकरण झालं नव्हतं, सोशल मीडियाचं आगमनही झालेलं नव्हतं… आता सगळ्यांच्या हातात मोबाइल आहे, हा एक डिजिटल इंटरफेस कोणीच टाळू शकत नाही… आपण केलेले सर्च, आपण एकमेकांत केलेल्या चर्चा, यांच्या आधारावर आपल्याला जाहिराती दिसतात, हे तर अगदी लहान पोरांनाही माहिती आहे. आपण महिन्याभरात कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी कुठे उलथलो होतो, हे गुगल मॅप्स न विचारता सांगतो; हे तुम्ही बंद करू शकता- पण म्हणजे स्वत:ची माहिती स्वत:ला मिळणंच बंद करू शकता- तुमच्या लोकेशन हिस्टरीनुसार गुगलकडे ती माहिती जमा होतेच आहे… कधीकधी तुम्ही फेसबुकवर ‘पीपल यू मे नो’मध्ये एखादा चेहरा पाहून चक्रावता, तो ओळखीचा असतो आणि तरीही कोण आहे ते कळत नाही… मग लक्षात येतं की आपण काही काळापूर्वी शेअर टॅक्सीने तासाभराचा प्रवास केला होता, तेव्हा सोबत असलेली अनोळखी व्यक्ती ही आहे…

…म्हणजे आता ही वरच्या कथेतली मुलगी काय काय खरेदी करते, त्यात काय बदल झाले, याबरोबरच इतर किती गोष्टी डिजिटल इंटरफेस आणि इंटरनेटच्या माध्यमातून पुरवठादारांना कळत असतील?... केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने अमेरिकेत मतदारांची मनं घडवण्याचे जे उद्योग केले, ते उघड करणाऱ्या द ग्रेट हॅक या गाजलेल्या डाॅक्युमेंटरीच्या कर्त्याची २०१९मधली माहिती अशी आहे की आपले असे ७० हजार मर्मबिंदू आयटी उद्योगाच्या हातात आहेत, ज्यांचा आपल्यालाही पत्ता नाही… आपण कोण आहोत, काय विचार करतो, कसं मतदान करतो, काय खातोपितो याची आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे आहे…

…बाकीचं सगळं चित्र हे असं अॅडव्हान्स असताना आपण टीव्हीवर काय पाहतो, हे कसं मापलं जातं? टीआरपी किंवा टेलिव्हिजन रेटिंग पाॅइंट हा शब्द प्रत्येकाच्या कानावरून गेला असेलच… आजवर गेला नसेल तर गेल्या दोन दिवसांत तो अर्णबने डोक्यात घुसवला असेल… हा टीआरपी काही ठरावीक घरांमध्ये विशिष्ट यंत्र टीव्हीला जोडून मोजला जातो. देशात ४५००० आणि मुंबईत अशी २००० मशीन आहेत म्हणे! लोकसंख्येच्या प्रमाणात ही मशीन देशभर फिरती ठेवायची आणि ती ज्यांच्या घरात लावू त्यांना सगळ्या सूचना द्यायच्या, मग त्या घरांमध्ये लोक काय पाहतायत, याची माहिती गोळा करायची आणि त्या आधारावर टीआरपी जाहीर करायचा, असा हा उद्योग आहे. जिथे तुम्ही दोन दिवस कुकरी शो बघितले तर तिसऱ्या दिवशी यूट्यूब तुमची आवड हेरून तुमच्यापुढे रेसिपींच्या शोजचे ढीग ओतते; तुम्ही ओटीटी प्लॅटफाॅर्मवर जे पाहाल, जे सर्च कराल त्याच्या आधारावर ‘बिकाॅज यू वाॅच्ड धिस’ म्हणून त्या प्रकारातल्या मनोरंजक कार्यक्रमांची माळका लावली जाते आणि जिओ फायबरही जिथे तुम्ही आधी काय पाहात होतात याची नोंद ठेवतो, तिथे देशातले लोक काय पाहतायत हे समजण्यासाठी हे बाबा आदमच्या जमान्यातलं, भ्रष्ट मार्गांची अनेक बिळं बुजबुजवू शकणारं तंत्रज्ञान वापरावं लागतं? कधीकाळी त्याला पर्याय नसेल, पण आताही?  

खरी गंमत ही आहे की टीआरपी मापन करणारी काही कोणतीही तटस्थ, त्रयस्थ यंत्रणा नाही. टेलिव्हिजन उद्योगाचे जे प्रमुख भागीदार म्हणजे जाहिरातदार आणि ब्राॅडकास्टिंग कंपन्या यांनी मिळून स्थापन केलेली बीएआरसी नावाची संस्था हे मापन करते… काही लक्षात आलं का? टेलिव्हिजनचे कोट्यवधी प्रेक्षक हे टेलिव्हिजन उद्योगाचे खरे मायबाप, ते भागीदारही नाहीत यांच्यामते. तुम्ही फक्त ग्राहक आहात किंवा वाईट भाषेत सांगायचं तर गिऱ्हाईक. या टीव्हीच्या चालकांनी (जाहिरातदार आणि चॅनेलमालक) मिळून प्रेक्षकांच्या घरात काय काय चैनीच्या वस्तू आहेत याच्या आधारावर आपली विभागणी केलेली आहे विविध श्रेणींमध्ये आणि कोणत्या श्रेणीत कोणता कार्यक्रम, चॅनेल पाहिला जातो हे कळल्यावर कोणता उत्पादक कोणत्या कार्यक्रमाला, चॅनेलला जाहिरात देणार हे ‘तटस्थ’पणे ठरवण्यासाठी ही सगळी उठाठेव आहे.

हे टीआरपी प्रकरण येण्याच्या आधीचा टीव्ही सर्वसमावेशक होता, साधा होता, जाहिरातीही होत्याच, पण त्यांनी फक्त वस्तू विकायला घेतल्या होत्या; अॅस्पिरेशन्सच्या गोंडस नावाखाली यशस्वी असणं म्हणजे काय, आयुष्यात प्रगती करणं म्हणजे काय, कोणत्या वस्तू घरात असल्याच पाहिजेत, इथपासून ते देशातली कोणती मूल्यं महान आहेत, कोणते विचार उच्च आहेत, कोणत्या जीवनशैली आदर्श आहेत, इथपर्यंत सगळं नियंत्रित करायला घेतलं नव्हतं… आजच्या कृत्रिम बटबटीत मालिकांपासून, पैसे देऊन बसवलेल्या प्रेक्षकांकडून बळेच हसू पेरणारे हास्यकार्यक्रम, कलावंताच्या गुणवत्तेऐवजी उगाच नाट्यमय गरिबी वगैरे बॅकस्टोऱ्या दाखवणारे भंपक गुणवत्ताशोध कार्यक्रम आणि बनावट बातम्या, अकारण प्रक्षोभक पॅनेलचर्चा आणि कुत्र्याच्या नाकावरची माशीही न उठवणाऱ्या ब्रेकिंग न्यूजपर्यंतचे सगळे ताप या टीआरपी नामक पँडोराच्या बाॅक्समधून बाहेर पडलेले आहेत… टीआरपीमध्ये प्रेक्षकांच्या अभिरुचीचं प्रतिबिंब पडतं, असं भासवून प्रत्यक्षात त्यांच्या अभिरुचीला आपल्याला कोणता माल खपवायचा आहे, त्याअनुषंगाने वळण देण्याचाच हा प्रकार आहे… तो अधिक गंभीर आहे.

सध्या चर्चेत असलेलं टीआरपी फ्राॅड खणलं जाईल, गुन्हेगार पकडले जातील, त्यामागचे अजेंडे सफल होतील, यात शंकाच नाही… पण, ते खरं स्कॅम आहे का? आपण आताच शिंकलो म्हणजे आपल्याला सर्दीच्या औषधांच्या जाहिराती दाखवल्या पाहिजेत हे ठरवण्याइतकं डिजिटल तंत्रज्ञान पुढे गेलेलं असताना थेट प्रत्येक टीव्हीवर काय पाहिलं जातंय याचा रिअल टाइम डेटा मिळवणं सहजशक्य आहे. तो न मिळवता टीआरपीचा हा सगळा फार्स फार गंभीर ताटस्थ्याच्या अभिनयासह चालवणं हा अधिक मोठा स्कॅम आहे… त्याच्या मुळाशी कुणी जाईल, अशी शक्यताच नाही.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा