Advertisement

ठाणे परिवहन सेवेच्या बसेस भगव्या रंगात दिसणार

परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेत कोणत्याही प्रकारची तिकीट दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

ठाणे परिवहन सेवेच्या बसेस भगव्या रंगात दिसणार
SHARES

ठाणे परिवहन सेवेचा (thane) 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 791 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेत सादर करण्यात आला.

परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेत कोणत्याही प्रकारची तिकीट दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

मात्र वाढती लोकसंख्या आणि अपुरी बससेवा यामुळे परिवहन व्यवस्थेवरील ताण स्पष्टपणे समोर आला आहे. भविष्यात 30 टक्के तिकीट दरवाढ होण्याची शक्यता टीएमटी प्रशासनाने व्यक्त केली आहे.

येत्या काळात परिवहन ताफ्यात दाखल होणाऱ्या बस भगव्या रंगात (saffron) असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ठाणे महापालिका हद्दीत सुमारे 27 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे.

नियमानुसार प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे किमान 30 बस आवश्यक आहेत. त्या प्रमाणात शहरासाठी सुमारे 1,350 बसेसची गरज आहे.

मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ 407 बसेसच रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांना अपुऱ्या सेवेचा सामना करावा लागत आहे.

परिणामी गर्दी, बस उशिरा येणे आणि अपुरी कनेक्टिव्हिटी या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईच्या (mumbai) धर्तीवर ठाण्यात डबलडेकर बस सुरू करण्याचे आश्वासन यंदाही अर्थसंकल्पात देण्यात आले आहे.

मागील वर्षीही अशीच घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात एकही डबल डेकर बस रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे यंदाचे आश्वासन कितपत प्रत्यक्षात उतरणार, याबाबत प्रवाशांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.

आर्थिक बाजू पाहता ठाणे परिवहन सेवेची स्थिती अद्यापही डळमळीत आहे. सेवा सुरळीत चालवण्यासाठी परिवहन प्रशासनाने 538 कोटी 30 लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती, मात्र महापालिकेने (tmc) अर्थसंकल्पात केवळ 290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

त्यामुळे उर्वरित निधी कसा उभारला जाणार, हा प्रश्न कायम आहे. वेतन व भत्त्यांसाठी 2 कोटी 89 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2026 अखेर 1,370 कर्मचारी निवृत्त झाले आहेत.

तसेच त्यांच्या निवृत्ती निधीसाठी 54 कोटी 5 लाख खर्च अपेक्षित आहे. तसेच कर्मचारी थकबाकी 340 कोटी 96 लाख इतकी प्रलंबित आहे. त्यापोटी महापालिकेकडून 178 कोटी 85 लाख अनुदान अपेक्षित आहे.

येत्या काळात टप्प्याटप्प्याने पीएम बस योजनेंतर्गत 100 नवीन बस परिवहन ताफ्यात दाखल होणार असून, या सर्व बस भगव्या रंगात असल्याची माहिती व्यवस्थापक बेहरे यांनी दिली.

एकीकडे तिकीट दरवाढ टाळून प्रवाशांना दिलासा देण्यात आला असला, तरी बसची कमतरता, आर्थिक तुटवडा आणि अपूर्ण आश्वासने या समस्या कायम आहेत.

तसेच त्यामुळे आता ठाणेकरांचे लक्ष डबलडेकर बस प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि नवीन बससेवेचा दर्जा कितपत सुधारेल याकडे लागले आहे.



हेही वाचा

मध्य मुंबईत वाहतुकित बदल

आता 8 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा