मुंबईतील (mumbai) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात (राणी बाग) आता बोगद्यातील मत्स्यालयही होणार आहे. हे मत्स्यालय तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षी-प्राण्यांचरोबरच विविध प्रकारच्या मत्स्यजीवांचाही आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.
याशिवाय राणी बागेतील पेंग्विनची वाढती संख्या पाहता पेंग्विन कक्षाचा विस्तार करण्याचा निर्णयही महापालिकेने (bmc) घेतला आहे. हे कामही मत्स्यालय तयार करणाऱ्या कंत्राटदाराकडेच सोपविण्यात आले आहे.
मत्स्यालय (aquarium) आणि पेंग्विन कक्षाचा खर्च 81 कोटी 58 लाख रुपये खर्च असून, ही सर्व कामे एक ते दीड वर्षात पूर्ण करावी लागणार आहेत.
सन 2017 मध्ये राणी बागेत पेंग्विन आणण्यात आले आणि या बागेत पर्यटकांची संख्या वाढत गेली. राणी बागेचा सध्याच्या जागेतच विस्तार करून विदेशी प्राणिसंग्रहालय सुविधा देण्याचे प्रस्तावित आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सध्याच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयात विदेशी प्राणी जोडण्यासाठी स्थानिक प्रजातीच्या प्राण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यमान राणी बागेतील जागेची मर्यादा लक्षात घेता मत्स्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे राणी बागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर पेंग्विन कक्षासमोरच बोगद्यातील मत्स्यालय तयार केले जाणार आहे. यासाठी निविदा काढल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लवकरच कंत्राटदाराला कामाचे कार्यादेशही दिले जातील, अशी माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
हेही वाचा