Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'हे' नियम बंधनकारक

शासकीय पातळीवर ज्या सूचना करण्यात येत आहेत, त्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'हे' नियम बंधनकारक
(Representational Image)
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना संदर्भात साथरोग आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली शासकीय पातळीवर ज्या सूचना करण्यात येत आहेत, त्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भाकीतांनी सर्वसामान्यांना चिंतेत टाकलं आहे. एका बाजूला उद्योगधंदे सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. अशातच सणासुदीला सुरूवात होत असल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ न देता, काटेकोरपणे नियमांचं पालन करत सण साजरे करण्याची जबाबदारी सर्वसामान्यांवर येऊन पडलेली आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांनी गणपतीसाठी कोकणात जाण्याच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे. त्यातच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कोकणातील प्रवेशासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोकणात जाण्यासाठी लशीच्या दोन मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असेल का? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत.

यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ओणम सणाच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे केरळातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज ३१ हजारांपर्यंत वाढली. या अनुषंगाने आपण केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असता वाढलेल्या गर्दीमागचं कारण ओणम असल्याचं स्पष्ट झालं. केरळमध्ये सणासुदीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे जी रुग्णवाढ झाली त्याकडे पाहता, ‘पुढच्याच ठेच, मागचा सावध’ या उक्तीनुसार केंद्राने महाराष्ट्रास काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सणासुदीच्या काळात गर्दी होऊन करोना संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात काही अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. 

या सर्व शासकीय नियमांचं पालन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी करावं, जेणेकरून कोरोना संसर्ग न पसरता आनंदाने सण साजरा करता येईल, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा