Advertisement

बेस्टच्या गोरेगाव आगारातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोना

बेस्ट उपक्रमाच्या गोरेगाव आगारात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्टच्या गोरेगाव आगारातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोना
SHARES

बेस्ट उपक्रमाच्या गोरेगाव आगारात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव आगारातील विश्रांतिगृहात राहणाऱ्या कर्मचाऱ्याचीच चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आगारात काम करणाऱ्या सर्वच वाहक आणि चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

गोरेगाव आगारातील एका कर्मचाऱ्याला १५ दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. मात्र त्याच्या घरातील एका सदस्याकडून त्याला ही लागण होती. त्या पाठोपाठ मीरा रोड इथं राहणाऱ्या एका वाहकाला लागण झाली. त्यानंतर आता या आगारात विश्रांती कक्षातच राहणाऱ्या एका वाहकाला कोरोना झाल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबईबाहेर राहणारे अनेक वाहक व चालक आगारातच रोज टोकन घेऊन विश्रांती कक्षात राहत आहेत व आपली सेवा देत आहेत.

या कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर विश्रांती कक्ष बंद करण्याचा प्रशासनाचा विचार होता. परंतु कामगारांच्या राहण्याची आधीच सोय नाही, त्यात त्यांना बेस्टच्या वसाहतीत घरातच अलग ठेवले तरी रहिवासी तक्रार करतात. त्यामुळं हा विश्रांती कक्ष बंद करू नये अशी सूचना कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी केली होती.

तिसऱ्या रुग्णांच्या संपर्कातील १५ कर्मचाऱ्यांचं अन्य ठिकाणी विलगीकरण करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, आगार बंद करण्यात आलेले नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. यामुळं अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २७ आगारांत चालक-वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांची तपासणी करणारे इन्फ्रोरेड थर्मल यंत्रच घेतलेले नाही.

वैद्यकीय कर्मचारी, पालिका कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टकडून मुंबईबरोबरच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरापर्यंत बस चालवण्यात येत आहेत. दररोज ३,२०० पैकी दीड हजार बसगाड्यांवर सुमारे ३ हजारांपर्यंत चालक आणि ३ हजार वाहक कार्यरत आहेत. वाहतूक निरीक्षक, स्टार्टर व अन्य कर्मचारी वेगळे आहेत.

कर्तव्यावर जाण्याआधी २७ आगारात कर्मचारी हजेरी लावतात. प्रवासात अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. अधूनमधून विश्रामकक्षात जातात. परंतु चालक-वाहक, कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी करण्यासाठी २७ आगारांत यंत्रणाच नाही. के वळ मास्क व सॅनिटायझरवर अवलंबून राहावे लागते. किमान ताप मोजणारे यंत्र असावे अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा