Advertisement

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली


मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली
SHARES

एकाबाजूने मुंबईत कोरोनाने थैमान घातलेलं असताना मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवार ८ मे २०२० रोजी घेतला आहे. परदेशी यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असलेल्या इक्बाल चहल यांच्याकडे मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. 

मुंबईत जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने उघडण्याबाबतचा आदेश काढताना पालिका आयुक्तस्तरावर गोंधळ पाहायला मिळाला. खासकरून मद्यविक्रीच्या दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर मुंबईत जी काही गर्दी उसळली हाेती, त्यावरून सरकारवर विरोधकांकडून चांगलीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर रातोरात परदेशी यांनी नवीन आदेश काढत मद्यविक्रीची दुकाने पुन्हा बंद करायला लावली. अशाच पद्धतीने इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर दुकानांच्या बाबतीतही रात्रीच्या वेळेस आदेश काढण्यात आला होता. यामुळे सरकारमधील काही मंत्री त्यांच्यावर नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे.


देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी देखील महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७९७३ वर गेला असून ६९४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईतच ११३९४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मागच्या ४ दिवसांमध्ये राज्यात १० हजार रुग्णांची भर पडल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 

१९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या प्रवीण परदेशी यांनी मे २०१९ मध्येच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याआधी परदेशी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यामुळे परदेशी हे माजी फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचंही म्हटलं जातं.

प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करतानाच सध्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना हटवून त्यांच्या जागी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर जऱ्हाड यांची मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मदत आणि पुनवर्सन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचीही बदली करण्यात आली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा