Advertisement

नगरसेवक आणि सहायक आयुक्तांमध्ये पुन्हा उफाळला वाद


नगरसेवक आणि सहायक आयुक्तांमध्ये पुन्हा उफाळला वाद
SHARES

अतिक्रमणांवरील कारवाईमुळे पुन्हा नगरसेवक आणि सहायक आयुक्तांमध्ये वाद उफाळून आला आहे. अतिक्रमणावर कारवाई करताना मिनारा मस्जिदला धक्का पोहोचवणाऱ्या, तसेच दहिसरमधील पात्र बांधकामांवर कारवाई केल्याचा जाब विचारला म्हणून नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या सहायक आयुक्तांविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे, 'दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी व्हावी', असे सांगत पुढील सभेमध्ये दोन्हींचे अहवाल सादर करण्याचा आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.


मिनारा मस्जिदला कारवाईदरम्यान धक्का?

महानगरपालिकेच्याा ‘बी’ विभागाच्या हद्दीतील मेमनवाडा मार्ग, पायधुनी येथील जगप्रसिद्ध मिनारा मस्जिद या धार्मिक स्थळालगत असलेल्या रस्त्यांवर गेली अनेक वर्ष अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. ठाण मांडून बसलेल्या विविध व्यावसायिकांच्या या अनधिकृत पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई करताना कोणत्याही प्रकारची नोटीस, किंबहुना सूचना न देता जेसीबीच्या मदतीने दुकानांचे फलक व वाढीव बांधकामे तोडण्यात आली. त्यामुळे याठिकाणी असलेल्या इस्माईल हबीब मस्जिदसह मिनारा मस्जिदच्या बांधकामाला तडे गेल्याची बाब हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करत काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी 'दबंगगिरी दाखवणाऱ्या सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी त्यांनी केली.


नगरसेवकांवर FIR कुणाच्या परवानगीने?

या हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा देत, आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी तीन नगरसेवकांसह ६० शिवसैनिकांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले. आपल्याकडून ही चूक झाल्याची बाब सहायक आयुक्तांनी मान्य केली. परंतु, प्रत्यक्षात त्या कुटुंबाला घर पुन्हा बांधून दिले नाही. त्यानंतर आयुक्तांनी याची दखल घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्याच रात्री तीन नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे हा एफआयआर कुणाच्या परवानगीने दाखल केला? असा सवाल करत हा एफआयआर त्वरीत मागे घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.


...तर नगरसेवकांनी काम कसे करायचे?

नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनीही, 'सर्व पुरावे असतानाही ही कारवाई केली आहे. केवळ न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याविरोधात एफआयआर होतो. मग नगसेवकांनी काम कसे करायचे?' असा सवाल केला. भांडुप गावातील तब्बल १५ कुटुंबांवर महापालिकेकडून कारवाई केली आहे. परंतु, त्यांच्याकडे १९६१चे पुरावे असूनही केवळ येनकेन प्रकारेन त्यांना घरापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप भाजपाच्या सारीका पवार यांनी केला.


FIR मागे घेण्याची मागणी

नगरसेवक हा महापालिकेचा विश्वस्त असून करदात्यांच्या व्यथा तो मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, असे सांगत काँग्रेसच्या तुलीप मिरांडा यांनी महापालिकेचे अधिकारी नियमानुसार कारवाई करत नाही. उलट बेकायदेशीर काम करत नगरसेवकांवर दोषारोप करत असल्यामुळे ज्या तीन नगरसेवकांविरोधात एफआयआर दाखल केले आहेत, ते त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.


मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?

झोपड्यांवर कारवाई करणारी महापालिका मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच मॉलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहेत, तिथे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. आज एका प्रभाग समिती अध्यक्षांविरोधात एफआयआर झाला आहे. पुढील पाच वर्षांमध्ये यापेक्षा अधिक प्रभाग समिती अध्यक्षांवर असे एफआयआर दाखल होतील, अशी भीती व्यक्त करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या सभागृहापेक्षा कुणीही सर्वोच्च नाही. आणि या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून महापौर हेच सर्वोच्च पद आहे. मिनारा मस्जिद ही हेरीटेज आहे आणि जर त्याला या कारवाईदरम्यान धक्का लागला असेल, तर त्या सहायक आयुक्तांना निलंबित करण्यात यावे, तसेच याविरोधात त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात यावा, अशी मागणी राजा यांनी केली.

महापालिका आयुक्त हे नगसेवकांचे ऐकत नाहीत, सभागृहाचे ऐकत नाहीत. त्यामुळे जर आयुक्तांच्या वर्तनात बदल होणार नसेल, तर आयुक्तांच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मंगेश सातमकर यांनी दिला.

सभागृहातील सर्व सदस्यांचे पावित्रे, तसेच त्यांचे अधिकार लक्षात घेता ज्या भावना तसेच संताप नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केला आहे, ही बाब गंभीर आहे. नगरसेवक हे महापालिकेचे विश्वस्त आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच हरकतीच्या मुददयाद्वारे जी बाब मांडली आहे, त्याचाही अहवाल पुढील सभेपुढे सादर केला जावा, असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा