Advertisement

संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिलेदार, ज्येष्ठ पत्रकार दिन रणदिवे यांचं निधन

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा लढ्यांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हा लढा पेटवत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं मंगळवार १६ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झालं.

संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिलेदार, ज्येष्ठ पत्रकार दिन रणदिवे यांचं निधन
SHARES

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा लढ्यांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हा लढा पेटवत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे (veteran journalist dinu randive passed away in mumbai) यांचं मंगळवार १६ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापूर्वीच त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर रणदिवे यांचीही प्रकृती आण्खी खालावत गेली.

डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये दिनू रणदिवे यांचा जन्म झाला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली सुरू केलेल्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाच्या अनियतकालिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. वंचित-शोषितांचा आवाज म्हणून ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरपर्यंत कार्यरत राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला होता. एवढंच नाही, तर त्यांनी अण्णा डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरूंगवासही भोगला होता. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रणदिवे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.

ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोठा दुवा निखळला. पत्रकारितेतून त्यांनी गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्या निधनाने पत्रकारितेचे वैभवच गेले, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

तर, संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो. दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित, गिरणी कामगार यांचे प्रश्न ऐरणीवर आणले. बांगलादेश युध्दाचे प्रत्यक्ष वार्तांकन केले. मुंबईतील दंगलीचे वार्तांकन करताना या दंगलीचे सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा