नव्या महापौरांचा गृहप्रवेश लांबणार

 Byculla
नव्या महापौरांचा गृहप्रवेश लांबणार

मुंबई - मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान असलेल्या शिवाजी पार्कमधील महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नव्या महापौरांचा भायखळ्यातील राणीबागेत मुक्काम हलवावा लागणार आहे. परंतु राणीबागेत अतिरिक्त आयुक्त राहत असलेला बंगला महापौर निवासासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंगल्याच्या नुतनीकरणास अद्यापही सरुवात न झाल्यामुळे नव्या महापौरांचा गृहप्रवेश हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत सत्तेची गणितं शिवसेना आणि भाजपाकडून आखली जात आहे. पण सत्तेची ही गणितं कुणाची अधिक जमून येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सत्ता कुणाची येणार हे जरी आज सांगता येत नसले तरी प्रत्यक्षात महापौरपदासाठी दोन्ही पक्षांमधील नगरसेवकांची यादी स्पर्धेत आहे. महापौर कुणाचाही होवो. पण नवीन होणाऱ्या महापौरांना शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक अशा महापौर निवासाचे वैभव अनुभवता येणार नाही. महापौर निवासाची जागा शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर याला महापालिकेनेही मंजुरी दिली आहे.

भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) दोन बंगले आहेत. एक बंगला हा उद्यान अधिक्षकांचा असून दुसऱ्या बंगल्याचा वापर सध्या अतिरिक्त आयुक्त यांच्यासाठी केला जात आहे. मात्र, महापौर निवासाची जागा स्मारकासाठी देण्यात आल्यानंतर महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाची निवड अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहत असलेल्या बंगल्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. येत्या 9 मार्चला नवीन महापौर विराजमान होणार आहे. पण महापौरांच्या निवासस्थानाचाच पत्ता नसून बंगल्याची डागडुजी महापौरपदाला साजेशी करण्यासाठी याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी किमान तीन ते पाच महिन्यांचा अवधी जाणार आहे. त्यामुळे नवीन महापौरांचा नव्या निवासातील गृहप्रवेश हा लांबणीवर पडण्याची शक्यता महापालिकेच्याच अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading Comments