
मुंबई (mumbai) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात (dams) जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे (rain) पाणीसाठा 89.08 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मे 2027 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी धरणात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी आणखी 1 लाख 10 हजार दशलक्ष लिटरने पाण्याच्या पातळीत वाढ होणे गरजेचे आहे.
तसेच त्यासाठीच 15 मे पासून लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत मुंबई महापालिकेने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते.
सध्या सातही धरणांत 2 ऑगस्ट रोजी 12 लाख 89 हजार 289 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र एल निनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे धरणातील पाणीसाठा 100 टक्के होत नाही, तोपर्यंत 10 टक्के पाणीकपात लागूच असणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या (bmc) जल विभागाकडून सांगण्यात आले.
ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र रविवारी पावसाने उसंत घेतली.
मात्र मुंबईला पाणीपुरवठा (water supply) करणारी धरणक्षेत्रे नाशिक, पालघर, वाडा जिल्ह्यात येत असल्याने तिथे पावसाची संततधार कायम आहे.
थोड्या शिडकाव्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही सर्व धरणे काठोकाठ भरतील, अशी शक्यता जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अखंड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात दोन महत्त्वाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पांजरापूर येथील क्लोरीन प्लांट एम-3 मध्ये एचएमआय (ह्यूमन मशीन इंटरफेस) पॅनल आणि क्लोरिन लीक डिटेक्टर पॅनलची पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वयनासह संबंधित कामे करण्यात येणार आहेत.
तसेच पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा ऊर्जा आणि विद्युत वितरणाचे सर्वंकष ऑडिटही करण्यात येणार आहे.
क्लोरिन प्लांटमध्ये बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक एचएमआय पॅनलमुळे यंत्रणेचे नियंत्रण अधिक सुलभ होणार आहे. क्लोरिन गळतीची त्वरित माहिती देणारी लीक डिटेक्टर प्रणालीही कार्यान्वित होणार आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच जलशुद्धीकरण प्रक्रियेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. क्लोरिनसारख्या धोकादायक रसायनाच्या हाताळणीत ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा
