पावसाळ्यातही महापालिकेची कामं सुरुच

 Parel
पावसाळ्यातही महापालिकेची कामं सुरुच
Parel, Mumbai  -  

पावसाळा सुरू असताना विकासकामं तसंच दुरुस्तीची कामं करण्याबाबत सरकारी नियम आहेत. त्यामुळेच अपवादात्मक परिस्थिती वगळता या काळात दुरुस्तीची कामं केली जात नाहीत. एलफिन्स्टन स्टेशननजीकच्या फितवाला मार्ग परिसरातल्या रस्ता दुरुस्तीसाठी मात्र पावसाळयाचा मुहूर्त मिळणार आहे, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. फितवाला मार्गावरचं अर्धवट राहिलेलं रस्ता दुरुस्तीकाम या मार्गावर दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं निमित्त बनलं आहे. गेले सहा महिने दुरुस्तीकाम सुरू आहे. पावसाळ्याची चाहुल लागल्यानंतरही कामात प्रगती दिसत दिसत नाही. स्टेशनजवळच्या गटाराच्या कामासाठी मोठा खड्डाही खणण्यात आला आहे.

गटाराच्या दुरुस्तीच्या कामाला 16 मे पासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे याठिकाणी पाणी अडून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हे काम केलं जात आहे. सध्या ए पी आय सिव्हील कंपनीला या कामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. पावसाळ्याने जोर पकडण्याआधी हे काम पूर्ण होणार नाही, असं सकृतदर्शनी दिसत असलं तरीही 8 दिवसांत पूर्ण होईल, अशी हमी साईट इंजिनिअरने दिली आहे. काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचा दावा केला असला तरी तूर्त मात्र पादचाऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच ये जा करावी लागत आहे.

फितवाला मार्गावर सहा महिने सुरू असलेल्या कामामुळे धुळीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच गटाराच्या कामामुळे त्यात अधिक भर पडली आहे. धूळ, दुर्गंधी, साचलेलं पाणी अशी अडथळ्यांची शर्यत पार करायला भाग पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या समस्या वाढली आहे.

Loading Comments