Advertisement

महापालिकेचे अभियंते 'एसआरए'त जाणार का?


महापालिकेचे अभियंते 'एसआरए'त जाणार का?
SHARES

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (एसआरए) प्रतिनियुक्तीवर पाठवण्यास आयुक्तांनी नकार दर्शवलेला असतानाच राज्य सरकारनं महापालिकेच्या १४ दुय्यम अभियंत्यांची प्रतिनियुक्ती जाहीर केली आहे. म्हाडा आणि महापालिकेच्या एकूण २१ दुय्यम अभियंत्यांना एसआरए प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येणार अाहे. अाता गृहनिर्माण विभागानं यासर्वांना प्रतिनियुक्तीनं एसआरएमध्ये नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.


अादेश जारी

शासनाच्या मंजुरीने या सर्वांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश देत गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव कि. गो. पठाडे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेचे आयुक्त तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले अाहेत. एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या सर्वांना तात्काळ रुजू करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.


दुय्यम अभियंत्यांची प्रतिनियुक्ती

एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यासाठी महापालिकेच्या वतीनं लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये जे दुय्यम अभियंते उत्तीर्ण झाले होते, त्या सर्वांची यादी गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून बनवून त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.


अायुक्तांनी घेतली भूमिका

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मागील आठवड्यातच ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांना पत्र लिहून यापुढे प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर महापालिकेचा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठवला जाणार नाही. ‘एसआरए’ ने यापुढे स्वत:च आपले अभियंते व कर्मचारी वर्ग यांची व्यवस्था करावी, असे कळवले होते. महापालिका आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे.


राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीचे पत्र

त्यामुळे आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्य सरकारने महापालिका व म्हाडा यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे या पत्रकानुसार या सर्वांना महापालिका आयुक्त ‘एसआरए’मध्ये पाठवणार की थांबवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


प्रतिनियुक्तीवर नियुक्त झालेले अभियंते

मुंबई महापालिकेचे दुय्यम अभियंते : राकेश जोशी, सचिन दुधभाते, प्रकाश शिनगारे, नितीन देशमुख, विनोद तिऱ्हेकर, जयप्रकाश गायकवाड, अभय संख्ये, मनोज जेऊरकर, चंद्रशेखर दिघावकर, सईद सरदार, वैभव पज्ञावार, गणेश बापट, अमित खोब्रागडे, राहुल शिंदे.

म्हाडाचे दुय्यम अभियंते : अमोल चौधरी, एस. एन. दुधाळे, डी. एन. महाजन, एस. एस. कदम, पी. एस. मिरचंदानी, एस. जी. कुरकुरे, पी. व्ही. घुटे.


हेही वाचा -

माहितेय का? यामुळे झाली मुंबईची बत्तीगुल!

काचेच्या इमारतींमधील सेंट्रलाईज्ड एसी ठरतात कर्दनकाळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा