Advertisement

माहितेय का? यामुळे झाली मुंबईची बत्ती गुल!

मुंबईच्या काही भागातील वीज शुक्रवारी अचानक गायब झाली. यामागचं कारण आहे, ते गुरूवारी मध्यरात्री कळव्यातील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये अचानक झालेला तांत्रिक बिघाड. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना चक्क भारनियमनाचा सामना करावा लागला हे तुम्हाला माहितेय का?

माहितेय का? यामुळे झाली मुंबईची बत्ती गुल!
SHARES

शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान अचानक मुंबईच्या काही भागातील वीज गायब झाली. साधारणत: दीड तासानंतर वीज पुन्हा आली. तेव्हा कधी नव्हे, ती इतका वेळ वीज गेली कशी? असा प्रश्न मुंबईकरांना पडला. तर यामागचं कारण आहे, ते गुरूवारी मध्यरात्री कळव्यातील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये अचानक झालेला तांत्रिक बिघाड. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना चक्क भारनियमनाचा सामना करावा लागला हे तुम्हाला माहितेय का? 


वीज ठरतेय अपुरी

कळव्यातील मोठं सब स्टेशन बंद पडल्यानं नवी मुंबई, ठाण्यासह मुंबईला होणारा वीज पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागातील वीज अचानक गायब झाली. पण बेस्ट आणि टाटा पाॅवरनं तात्काळ हालचाली करत पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून घेत दीड तासांत वीज पुरवठा पूर्ववत केला, अशी माहिती बेस्टनं एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. पण मुंबईकरांनो, महत्त्वाचं म्हणजे हे भारनियमन होतं.


दुरूस्तीला आठवडा?

कळव्यातील सब स्टेशनमधील युनिट दोनच्या दुरूस्तीचं काम महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू आहे. शक्य तितक्या लवकर दुरूस्ती करत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. पण हा बिघाड दुरूस्त करण्यासाठी किमान ३० ते ४० दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मुलुंड आणि नवी मुंबईच नव्हे, तर मुंबई आणि ठाणेकरांनाही अंधारात रहावं लागणार आहे. कारण कळव्यातील सब स्टेशनमधूनच या सर्व परिसरात वीज पुरवली जाते. पण आता हे सब स्टेशनच ठप्प झाल्यानं हा वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणच्या जनसंपर्क विभागानं मात्र शनिवारपर्यंत मुलुंड आणि नवी मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे. दुरूस्तीसाठी आठवडा लागणार असला तरी इतर ठिकाणांहून पुरेशी वीज उपलब्ध करून घेत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचंही जनसंपर्क विभागानं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.


मुंबईतही भारनियमन?

हे सबस्टेशन ठप्प झाल्यानं वीज पुरवठा कमी झाला असून त्याचा फटका मुंबईलाही बसला. दुपारी चारच्या दरम्यान दादर, किंग्ज सर्कल, शीव, फोर्ट, वडाळा आणि माहीम परिसरातील वीज गायब झाली. ही वीज खंडीत वा बिघाडामुळं गायब झाली नव्हती, तर बेस्ट आणि टाटा पाॅवरकडून भारनियमन करण्यात आलं होत. पुरेशी वीज नसल्यानं हे भारनियमन करण्यात आल्याचं बेस्टकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मुंबईकरांनाही शुक्रवारी भारनियमनचा अनुभव घ्यावा लागला.


पुरेशी वीज पुरवणार

बेस्टने दिलेल्या माहितीनुसार दीड तासाच्या कालावधीत अंदाजे ३० मेगावॅट इतकं भारनियमन करण्यात आलं. पण सबस्टेशन जोपर्यंत पूर्णपणे सुरू होत नाही, तोपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना वीज भारनियमाचा आणखी फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरणने मात्र ही शक्यता नाकारत सर्व शहरांसाठी पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात येईल, असं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं.



हेही वाचा-

मुलुंड, नवी मुंबईकर अंधारात!

मुंबईतील सिंधिया हाऊसला अाग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा