Advertisement

मुलुंड, नवी मुंबईकर अंधारात!

गुरूवारी मध्यरात्री उशीरा महापारेषणच्या कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला नि मुलुंड आणि नवी मुंबईतील काही परिसरात बत्ती गुल झाली. सब स्टेशनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम सुरू असून हे काम पूर्ण होऊन वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागणार असल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी दिली.

मुलुंड, नवी मुंबईकर अंधारात!
SHARES

आधीच उकाड्यानं हैराण झालेले मुलुंडमधील रहिवासी आणि नवी मुंबईकरांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. गुरूवार मध्यरात्रीपासून मुलुंड आणि नवी मुबंई अंधारात असून शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना वीजेविनाच राहवं लागण्याची शक्यता आहे.


कारण काय?

गुरूवारी मध्यरात्री उशीरा महापारेषणच्या कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला नि मुलुंड आणि नवी मुंबईतील काही परिसरात बत्ती गुल झाली. सब स्टेशनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम सुरू असून हे काम पूर्ण होऊन वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागणार असल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी दिली. काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे शुक्रवार आणि शनिवार संपूर्ण २ दिवस मुलुंडमधील रहिवाशांना आणि नवी मुंबईकरांना अंधारात राहवं लागणार आहे.


कुठे गेली वीज?

ज्या सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्या सब स्टेशनमधून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पूर्व-पश्चिम) या परिसरात वीज पुरवठा होतो. तर वाशी मंडळाअंतर्गत वाशी, एेरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे एमआयडीसी, कौपरखैरणे, बोनकोडे या परिसराला वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या सर्व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून अंधार आहे.


वीजपुरवठ्याचा भार

उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढते नि त्याचा वीजपुरवठ्यावरही मोठा परिणाम होतो. त्यातच वाढत्या वीजपुरवठ्याचा भार यंत्रणेवर पडतो नि मग अशा तांत्रिक अडचणी निर्माण होऊन वीज पुरवठा खंडीत होतो, असं म्हणत महावितरणने सब स्टेशनवर वीजपुरवठ्याचा भार पडल्यानं हा बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून शनिवारपर्यंत वीजपुरवठा सुरू होईल, असंही महावितरणनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

मुंबईतून ७/१२ उतारा होणार हद्दपार!

दरवाढीला ब्रेक, पेट्रोल 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा