पावसाळा तोंडावर येऊनही वडाळ्यातील नाले कचऱ्याने तुंबलेलेच

 Wadala Road
पावसाळा तोंडावर येऊनही वडाळ्यातील नाले कचऱ्याने तुंबलेलेच
Wadala Road, Mumbai  -  

पावसाळा तोंडावर आला तरी वडाळा पूर्वेकडील कोरबा मिठागर परिसरातील दोन मोठे आणि पाच छोट्या नाल्यांची स्वच्छता न झाल्याने हे नाले कचऱ्याने तुंबले आहेत. या नाल्यांमधील घाण तशीच असून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा उरलेली नसल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने या नाल्यांची पूर्णपणे सफाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी महापालिकेच्या एफ/उत्तर विभागाला लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वाडाळ्यातील कोरबा मिठागर परिसरात 10 हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. मात्र लोकवस्तीच्या तुलनेत कचराकुंड्यांची संख्या कमी असल्याने येथील रहिवासी कचरा थेट नाल्यातच टाकतात. त्यामुळे नाल्यात कचरा साचून राहतो. दररोज त्यात वाढच होताना दिसते. नाल्यातील गाळ आणि कचरा साफ करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी महिन्यातून एकदाही वेळेत हजेरी लावत नसल्याने नाल्यातील कचऱ्याला प्रचंड दुर्गंधी येते. गाळ आणि कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

त्यामुळे आदर्श रमाई नगर नाला आणि कोरबा मिठागर या दोन मोठ्या नाल्यांसहित रमामाता वाडी, नाना भाई वाडी, काळे वाडी, लक्ष्मणवाडी, नानूरवाडी नाला या पाच छोट्या नाल्यांची पूर्णपणे साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिक वारंवार करत आहेत. तरीही महापालिका याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने या नाल्याच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या नाल्याची वेळेत स्वच्छता केली नाही तर नाल्यालगतच्या लोकवस्तींमध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याप्रश्नी आम्ही महापालिकेच्या एफ/उत्तर विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. तक्रार नोंदवल्यावर महापालिकेचे कर्मचारी साफसफाईसाठी येतात. परंतु योग्य साफसफाई न करताच जात असल्याने सर्वत्र घाणीचे साम्रज्य पसरले आहे.
- महेंद्र गायकवाड, स्थानिक नागरिक

या परिसरातील सर्व नाल्यांची साफसफाई करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागातील नाल्यांच्या सफाईचे काम सुरु आहे. नाल्यातून काढलेला गाळ सुकल्यानंतर कर्मचारी हा गाळ त्वरित उचलून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावतील.
- लक्ष्मण व्हटकर, उपायुक्त (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प)

Loading Comments