कोरोना व्हायरसमुळं जगभरातील सर्वत क्रिडाक्षेत्राला मोठा फटका बसला आहे. भारतातील प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) देखील याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयनं आयपीएलचा १३वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे.
कोरोनामुळं आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली होती. परंतु, आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतात हे आधी पहावं लागेल, त्यानंतर आयपीएलच्या आयोजनाबद्दल विचार करता येऊ शकतो. दरम्यान, सरकारनं हिरवा कंदील दाखवल्यानंतरच बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतं.
आयपीएलप्रमाणं टी-२० विश्वचषक स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यास अनेक देशांचा नकार आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यास आयपीएल आयोजनाची संधी मिळू शकते.
हेही वाचा -
बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
विद्यापीठाच्या परीक्षांबाबत शुक्रवारी जाहीर होणार निर्णय