Advertisement

अॅबी कुरुविलाही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रिंगणात


अॅबी कुरुविलाही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी रिंगणात
SHARES

माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांनी मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्सुक असलेल्या उमेदवारांची नावं पुढे येत अाहेत. त्यात अाता अाणखी एका नावाची भर पडली अाहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अॅबी कुरुविलानेही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठीच्या रिंगणात उडी घेतली अाहे. कुरुविलाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अापण प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असल्याचे कळवले अाहे. एमसीएच्या अधिकाऱ्यांनीही कुरुविलाला सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे.


अॅबी यांना अाधुनिक क्रिकेटचीही चांगली जाण अाहे. पन्नाशीतही ते मुंबईच्या स्थानिक सामन्यांमध्ये सहभागी होत असतात. त्यांनी स्वत: अनेक लहान मुलांना क्रिकेट खेळताना पाहिले अाहे. त्यामुळे मुंबई संघ विकसित करताना फायदा होऊ शकतो. त्यामुळेच मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अाम्ही त्याच्याशी संपर्क साधला. अाम्ही त्याला ही अाॅफर दिली तर तो नक्कीच स्वीकारेल.
- एमसीएचे पदाधिकारी


प्रशिक्षकपदाचा अनुभव

२००० मध्ये क्रिकेट कारकीर्दीला अलविदा केल्यानंतर कुरुविलाने २००२ मध्ये केरळ रणजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळून केरळला एलिट गटात नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २००७ मध्ये ते संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाचे प्रशिक्षक बनले होते. सध्या कुरुविला हे मुंबई इंडियन्सच्या बॅकरूम स्टाफचा एक भाग अाहेत.


या भूमिकाही निभावल्या

जर प्रशिक्षकपदी निवड झाली तर त्यांचा हा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा पहिला कार्यकाळ असेल. मात्र याअाधी ते २०१२ मध्ये मुंबईचे निवड समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर एमसीएच्या कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले अाहे. कुरुविला हे ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष असताना भारताने २०१२ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता.


मुंबई क्रिकेटशी जुने नाते

केरळमध्ये जन्मलेले असले तरी हाडाने मुंबईकर असलेल्या कुरुविला यांनी रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व केलं अाहे. मुंबईचं क्लब क्रिकेट जवळून अनुभवणाऱ्या कुरुविला यांचं मुंबई क्रिकेटशी जुनं नातं अाहे. ते सध्या डाॅ. डी. वाय. पाटील समूहाचे क्रीडा संचालक अाहेत. कांगा लीग स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी ते अापल्या संघासोबत प्रवास करतात.

हेही वाचा -

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अोमकार साळवीची शिफारस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा