'डकवर्थ-लुईसला थेम्स नदीत बुडवा'

Mumbai
'डकवर्थ-लुईसला थेम्स नदीत बुडवा'
'डकवर्थ-लुईसला थेम्स नदीत बुडवा'
'डकवर्थ-लुईसला थेम्स नदीत बुडवा'
'डकवर्थ-लुईसला थेम्स नदीत बुडवा'
See all
मुंबई  -  

चँपियन्स ट्रॉफीत विजेतेपदाचं स्वप्न भंगण्यापेक्षाही पाकिस्तानबरोबर हरण्याचे दुःख तमाम भारतीयांना कायम सलत राहणार आहे. क्रिकेटच्या खेळात हार-जीत तर राहणारच. पण, हार-जीतवरून सोशल मीडियावर रंगणारे 'चॅट'युद्ध पाहता भविष्यातही भारत-पाक सामने म्हणजे वॉरफ्रंटच ठरणार एवढे मात्र नक्की !

असो, आजचा विषय या सामन्यातील पराभवापेक्षाही क्रिकेटला लागलेलं डकवर्थ-लुईस नामक ग्रहण कसं सुटेल, हा आहे. भारत-पाक सामन्यात या पद्धतीचा वापर करावा लागला नसला, तरी क्रिकेटच्या मूळ नियमांनाच हरताळ फासणारी डकवर्थ-लुईस पद्धत बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तर, हे प्रकर्षाने जाणवत असून क्रिकेटच्या 42 नियमांपैकी 'निकाल' या नियमालाच निकालात काढणाऱ्या या डकवर्थ-लुईसला थेम्स नदीतच विसर्जित करा, अशीच जोरदार मागणी करावी लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटला तारक ठरण्याऐवजी मारक ठरणारी ही पद्धत केवळ हट्टापायी राबवली जात आहे का? अशीच शंका येत आहे. पहिली फलंदाजी करणारा संघ जणू डकवर्थ-लुईसचा 'लाडका बाब्या' असल्यासारखेच नियम बनवणाऱ्या आणि ते स्वीकारणाऱ्यांच्या हेतूबद्दलही त्यामुळे कुणी शंका घेतली, तर आश्चर्य वाटायला नको. यापूर्वीही अनेकदा या पद्धतीवर आक्षेप घेतले गेले आणि वारंवार चुकाही दाखवल्या गेल्या. परंतु, सुधारणांपेक्षा क्रिकेटच्या नियमांनाच फाट्यावर मारण्याची (आजच्या पिढीची भाषा) प्रथा आजही कायम आहे.

जसा सेहवाग बेधडक फलंदाजी करायचा आणि आता तसंच बेधडक समालोचन (कॉमेंट्री) करतो, तसेच काहीसे या डकवर्थ लुईसचे झाले आहे. वाट्टेल तसे म्हणजे बेधडकपणे वागणे हे एका विशिष्ट काळापुरते चांगले वाटते. पण जसा सेहवाग अनेकदा नाहक विकेट टाकून संघाला अडचणीत आणायचा, तसेच डकवर्थ-लुईस पद्धतीने क्रिकेटलाच धोक्यात आणले आहे. जिथे डकवर्थ-लुईस आले तिथे पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकण्यावर जवळपास शिक्कामोर्तबच झाले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतही साऊथ आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा सामना किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील सामना याच पद्धतीने निकाली निघाला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 40 धावांनी आणि पाकने दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळवला. आता गंमत म्हणजे दुसरी फलंदाजी करणारा संघ विकेट्सनी जिंकत असताना हे विजय धावांच्या फरकाने जाहीर करण्यात आले. खरेतर सरासरी लक्षात घेऊनही निकाल जाहीर करता आले असते. परंतु, डकवर्थ-लुईस यांचे अजब गणित आजवर कुणालाच नीटसे कळले नाही. गंमत म्हणजे आयसीसीला तरी कळते का? असा प्रश्न खुद्द माहीलाही पडला आहे.

क्रिकेटच्या पुस्तकातील नियमानुसार, प्रथम फलंदाजी करणारा संघ हा धावांनी जिंकतो आणि दुसरी फलंदाजी करणारा संघ जितक्या विकेट्स पडायच्या बाकी आहेत, त्या संख्येनुसार जिंकतो. पण हे जे कुणी डकवर्थ लुईस आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार दुसरी फलंदाजी करणारा संघ धावांनुसारच जिंकतो. आता हे कसे? असे विचारण्याचा अधिकारही आपल्याला नाही. क्रिकेटचे बेसिक नियमच बदलण्याचे अधिकार यांना कुणी दिले, हे मात्र आपण विचारू शकतो ना?


डकवर्थ-लुईसला पर्याय

आता तुम्ही म्हणाल की फक्त टीका तर अनेक जण करतात. पण, आम्ही त्यावरील उताराही देण्याचा प्रयत्न करतो. 1981 साली मी देवधर ट्रॉफीदरम्यान पंच होतो. त्यावेळी मर्यादित सामन्यांसाठी नवीन नियम होता. त्याचे उदाहरण देतो.

देवधर ट्रॉफीत उत्तर विभाग विरुद्ध मध्य विभागाच्या सामन्यात कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली उ. विभागाने 50 षटकांत 250 धावा केल्या होत्या. तर, मध्य विभागाने संघनायक संजीव राव याच्या नेतृत्त्वाखाली फलंदाजी सुरू केल्यावर संजीव राव 15 षटकांनंतर प्रत्येक षटकानंतर मला सतत 'धावगती किती?' हे विचारत होता. गंमत म्हणजे, 34 व्या षटकानंतर जोरदार वारे वाहू लागले. पावसाळी वातावरण निर्माण झाले. ते लक्षात येताच रावने खेळाची गती आणखी वाढवली आणि 38 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर पावसाची संततधार सुरू झाली. ते षटक संपताच मी सामना थांबवला. कारण आम्ही तोपर्यंत सर्वच भिजून चिंब झालो होतो. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झालाच नाही आणि मला निकाल जाहीर करावा लागला.

तो निकाल देताना तेव्हा जो नवा नियम होता त्याचाच आधार मी घेतला. त्या नियमानुसार, 15 षटकांनंतर जर पाऊस किंवा कोणत्याही व्यत्ययाने सामना थांबला, तर त्याक्षणी जो संघ सरासरीनुसार पुढे असेल तो विजयी ठरणार होता. त्यानुसार, मी मध्य विभागाला विजयी घोषित केले. कारण, उत्तर विभागाने 38 व्या षटकांत 134 धावा केल्या होत्या आणि मध्य विभागाच्या 6 बाद 138 धावा झाल्या होत्या. अवघ्या ४ धावांनी पुढे असलेला मध्य विभाग जिंकल्याचे घोषित केले तरी विजय मात्र ४ धावांनी नव्हे तर उरलेल्या विकेट्सनीच म्हणजे ४ विकेट्सनी झाल्याचे जाहीर केले गेले.

या साध्या-सोप्या आणि पारदर्शक पद्धतीमुळे संजीव रावसारख्या हुशार संघनायकाने 15 ओव्हरनंतर सतत धावगतीवर लक्ष ठेवून कपिल देवसारख्या महानायकला हरवले. यात खेळाडूंची कामगिरी पावसापेक्षा सरस ठरली की नाही? डकवर्थ-लुईसच्या पद्धतीत खेळाडूंना आकड्यांचे गणित समजण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये पहावे लागते आणि संबंधितांना किचकट आकडेमोडीचा आधार घ्यावा लागतो.

आता यात आणखी एक बदलही करता येईल. तो म्हणजे, 15 षटकांचे बंधन न ठेवता केवळ सरासरीची अट ठेवायची. म्हणजे आधीच्या संघाने ज्या सरासरीने धावा केल्या असतील त्या सरासरीपेक्षा सरस किंवा जवळपासची सरासरी ठेवूनच प्रतिस्पर्धी संघ धावा करतील. म्हणजे पाऊस येवो किंवा इतर कोणतेही संकट, पण निकाल मात्र नक्की लागेल आणि तोही दोन्ही संघांना न्याय देत!

नाहीतर, न्यूझीलंडवर विश्वचषकाच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात झालेला अन्याय तुम्हाला आठवतच असेल. त्या सामन्यात 13 चेंडूंमध्ये 22 धावा हव्या असताना पाऊस पडला आणि नंतर डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार एका चेंडूंत 22 धावांचे आव्हान त्यांना मिळाले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघर्ष करण्याची त्यांची संधीच गमावली गेली.

एकूणच काय तर, जिथे क्रिकेटचा जन्म झाला तिथल्याच थेम्स नदीत या डकवर्थ-लुईसचे विसर्जन करा. म्हणजे, नवे जे काही नियम येऊ घातलेले आहेत त्यात सामने निकाली निघण्यासाठीही नव्या पद्धतीचा आविष्कार करता येईल किंवा मी सुचवलेल्या नियमांचाच आधारही घेता येईल.


डकवर्थ लुईस म्हणजे काय?


इंग्लंडच्या फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन ब्रिटिश संख्या शास्त्रज्ञांनी 2002 साली या पद्धतीचा शोध लावला. डकवर्थ लुईस ही पद्धत म्हणजे संख्याशास्त्र वापरुन तयार केलेला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा वापर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचा टार्गेट स्कोअर काढण्यासाठी केला जातो. अनेकदा आकडेमोडीमध्ये दुसऱ्या संघाला काहीच टार्गेट उरलं नाही, तर तो संघ विजेता ठरतो. एखाद्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पावसामुळे, खराब हवामानामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तो सामना थांबवला आणि पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.