Advertisement

MI vs RR 'राजस्थान'विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दणदणीत विजय


MI vs RR 'राजस्थान'विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दणदणीत विजय
SHARES

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईनं १९४ धावांचे आव्हान राजस्थानपुढे विजयासाठी ठेवलं होतं. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला मोठे धक्के सहन करावे लागले. तसंच मुंबईनं ५७ धावांनी मोठा विजय साकारला.

मुंबईनं यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. डीकॉकनं या सामन्यात १५ चेंडूंत २३ धावा केल्या. डीकॉक बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी चांगली रंगली. रोहित यावेळी अर्धशतक झळकावत विक्रम रचेल, असे वाटत होते. पण श्रेयस गोपाळने रोहितला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

रोहितने २३ चेंडूंत ३५ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर मुंबईचा इशान किशनही बाद झाला. त्यामुळे मुंबईला आता सलग २ धक्के बसले होते. मात्र, या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईला राजस्थानपुढे १९४ धावांचे आव्हान ठेवता आले. सूर्यकुमार यादवने यावेळी ४७ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटाकांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. यादवला यावेळी अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्याने चांगली साथ दिली. हार्दिकने यावेळी १९ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ३० धावा केल्या.

मुंबईनं दिलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल, स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन हे ३ खेळाडू लवकर बाद झाले. परंतु, त्यानंतर जॉस बटलरनं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या दिशेनं नेलं. बटलरने ४४ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७० धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण बटलरला दुसऱ्या फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही आणि राजस्थानचा पराभव झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा