मुंबई इंडियन्सची विजयाची बोहनी, वानखेडेवर बंगळुरूला धूळ चारली


SHARE

पहिल्या तीन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ११व्या पर्वात आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४६ धावांनी धूळ चारत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर विजयाची बोहनी केली. रोहित शर्मा आणि इविन लुइस यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २१३ धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरूचे दिग्गज शिलेदार एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली तटबंदीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. पण अखेर बंगळुरूला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.


पहिल्या दोन चेंडूंवर मुंबईची दांडी गुल

पहिल्या तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना होती. पण पहिल्याच दोन चेंडूंवर उमेश यादवने मुंबईला दोन हादरे दिले. डावाची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर युवा इशान किशनच्या यष्ट्या वाकवल्या. त्यानंतर मात्र इविन लुइसचा धमाका चाहत्यांना अनुभवता आला.


लुइस-रोहितची शतकी भागी

पहिले दोन फलंदाज शून्य धावसंख्येवर माघारी परतले तरी इविन लुइस आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. कोणतेही दडपण न घेता त्यांनी १०च्या सरासरीने धावा कुटल्या. तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी रचल्यानंतर लुइस बाद झाला. लुइसने ६ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत ४२ चेंडूंत ६५ धावा तडकावल्या. त्यानंतर रोहितने बंगळुरूच्या गोलंदाजांवर घणाघाती हल्ला चढवत मुंबईला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. रोहितने ५२ चेंडूंत १० चौकार आणि ५ षटकार ठोकत ९४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईला २० षटकांत ६ बाद २१३ धावा करता आल्या.


बंगळुरूला एकापाठोपाठ धक्के

मुंबईचे विजयासाठीचे २१ धावांचे लक्ष्य पार करताना विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक यांनी बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली. मात्र पाचव्या षटकांत मिचेल मॅकक्लेनाघनने क्विंटन आणि एबी डीव्हिलियर्स हे दोन्ही धोकादायक फलंदाज माघारी पाठवले. त्यानंतरही एका बाजुने बंगळुरूची पडझड कायम राहिली. १०व्या षटकांत कृणाल पंड्याने दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.


लढवय्या विराट

एकापाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहली एका बाजुने तटबंदीप्रमाणे मैदानावर खिंड लढवत होता. मात्र मधल्या फळीतील आणि तळाच्या एकाही फलंदाजाची साथ त्याला लाभली नाही. ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत नाबाद ९२ धावा विराटने केल्या. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरूला २० षटकांत ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या