अनेकदा एकाद्याची वारंवार मस्तरीतून वादाची ठिणगी पडते. त्यातून अनेकदा तरुण टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना घाटकोपरमध्ये उघडकीस आली आहे. वारंवार मस्करी करतो म्हणून शिव पवार या १५ वर्षीय मुलाची त्याच्या सख्ख्या आत्याच्या पतीने मोबाईल चार्जरच्या वायरने त्याची गळा आवळून हत्या केली. घाटकोपर पश्चिमेतील गोळीबार रोड भागात ही धक्कादायक घटना घडली. हिंमत गोयल (६८) असे या काकाचे नाव आहे.
घाटकोपरच्या गोळीबार नगरमध्ये गोयल हे पत्नीसोबत राहतात. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवची आई काही कामासाठी घराबाहेर पडली. शिवने तेव्हा काकांबरोबर मस्ती, मस्करी करण्यास सुरुवात केली. त्याचा राग येऊन गोयलने त्यास मारहाण सुरू केली. संधी साधून शिव घराबाहेर पडला. तेव्हा संतप्त गोयलने मोबाइल चार्जर घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. काकाच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी शिव स्वत:च्या घरी शिरला. पण, घरी कोणीही नसल्याने पाठलाग करत आलेल्या गोयलने शिवचा मोबाइल चार्जरच्या सहाय्याने गळा आवळला. शिव मृत पावल्याचे कळाल्यानंतर गोयल घाबरला. त्याने स्वत:च्या घरातून टाळे आणून ते शिवच्या घरास लावले. त्यानंतर तो घाटकोपर पोलिस ठाण्यात गेला. तिथे त्याने शिवचा अन्य एका चुलतभावाने ही हत्या केल्याचा बनाव रचला. पण, पोलिस तपासात त्याचे कृत्य दडून राहिले नाही.
घराबाहेर पडलेली शिवची आई परतली तेव्हा घराला टाळे पाहून चक्रावली. गोयलच्या घराचे टाळे पाहून तिने दोघांचा शोध सुरू केला. ते दोघेही सापडत नसल्याचे पाहून अन्य नातेवाईकांच्या सहाय्याने घराचे टाळे तोडण्यात आले. तेव्हा शिव हा बेशुद्धावस्थेत असल्याचे पाहून त्यास राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्राथमिक वैद्यकीय तपासात शिवच्या गळ्यावर काही खुणा सापडल्यानंतर ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तिथे घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला आणि गोयलची चौकशी केली असता त्यास गुन्हा लपविता आला नाही. त्याने स्वत:ला वाचविण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरू शकला नाही. घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.