नवी मुंबईतून 253 किलो केटामाईन जप्त


नवी मुंबईतून 253 किलो केटामाईन जप्त
SHARES

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईला चहुबाजूने वेढलं आहे. याचाच प्रत्यय नवी मुंबईत आणि पनवेलमध्ये आला. डीआरआय (महसूल गुप्तवार्ता संचलनालय)ने पनवेलमध्ये अंमली पदार्थांच्या कारखान्यासह नवी मुंबईतील दोन गोदांमांवर कारवाई केली. या कारवाईत 253 किलो केटामाईन, 12 किलो मेटाएम्फेटामाईन असा सुमारे (40 कोटी किंमतीचा) साठा जप्त करत याप्रकरणी देशभरातून 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबईत कारवाईदरम्यान एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणासह तिघांना अटक करण्यात आली.


मलेशियन टोळी सक्रीय

मुंबईत विविध मार्गांवरून येणाऱ्या अंमली पदार्थांवर रोख बसवण्यात डीआयआयला यश आल्यानंतर या तस्करीत मलेशियन टोळी सक्रीय झाली. परदेशातून अंमली पदार्थ छुप्या पद्धतीने आणने आता शक्य नसल्यामुळे या तस्करांनी शहराबाहेरील जवळच्या गोडाऊनमध्ये रासायनिक पद्धतीने अंमली पदार्थ बनवण्याचं ठाणलं आहे. कुणाला संशय येऊ नये यासाठी कपडे धुण्याची पावडर बनवण्याचा कारखाना असल्याचं सांगत ही अंमली तस्करी सुरू होती. 


डिटर्जंट पावडरच्या नावाखाली...

रसायनी परिसरात तयार होणारा माल परदेशात पाठवण्यासाठी सिंडिकेटने अनेक डमी कंपन्या उभ्या केल्या होत्या. त्यांच्या नावावर आयात निर्यात क्रमांक(आयईसी) घेण्यात आले होते. या आयईसी क्रमांकाच्या सहाय्याने डिटर्जंट पावडरच्या नावाखाली मलेशियात अंमली पदार्थांची निर्यात व्हायची. हे सर्व सिंडिकेट मलेशियातील भारतीय वंशाची टोळी चालवत आहे. त्यातील बहुसंख्य सदस्य तामिळनाडूतील रहिवासी आहेत.

याबाबतची माहिती डीआरआयच्या मुंबई युनिटला मिळाली होती. त्यासाठी उच्चशिक्षीत मुलांचा वापर करून हे अंमली पदार्थ निर्यात करण्यात यायचे. त्यानुसार नवीन पनवेल येथील रसायनी परिससात डीआरआयने छापा टाकून अंमली पदार्थांचा काखाना उद्ध्वस्त केला. आरोपींनी केटामाईन आणि मेटाएम्फेटामाईन ड्रग्ज चार किलोच्या प्लास्टिकच्या रोलमध्ये भरले होते. हे रोल 50 किलो 50 किलोच्या बॅगमध्ये लपवण्यात आले होते. याशिवाय नवी मुंबईतील कोपरखैराणे आणि तळोजा परिसरातील गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे.


तिघांना अटक

नवी मुंबईतील कारवाईत पुरवठा व्यवस्था पाहणाऱ्या जगदीश याला अटक करण्यात आली आहे. जगदीश हा एमबीए शिक्षीत असून त्याच्यासह वाहतूक व वित्तव्यवस्था पाहणारे साजू कासिम आणि एन. प्रकाश यांनाही डीआरआयने अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत दिल्ली आणि तामिळनाडूत कारवाई करण्यात आली असून देशभरातून आणखी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


रसायनी की ड्रग्ज निर्मिती केंद्र

गेल्या दोन महिन्यात रसायनी एमआयडीसी परिसरातून ड्रग्जचा हा दुसरा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. येथील एमआयडीसी परिसरात अनेक कारखाने असल्यामुळे त्याचा फायदा उचलून रसायनांच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती होत आहे. यापूर्वीही डीआरआयने कारवाई करून या परिसरातीतून केटामाईन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारवाईतही सुमारे 40 कोटींचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा