Exclusive: आतापर्यंत 7 पोलिसांना कोरोना, तर 47 पोलिस होम क्वारन्टाइन


Exclusive: आतापर्यंत 7 पोलिसांना कोरोना, तर 47 पोलिस होम क्वारन्टाइन
SHARES
देशात कोरोनाने सध्या हाहाकार माजवला असताना, कोरोना बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. या कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन एकवटलं असताना, या संसर्ग जन्य रोगाची लागन खाकीवर्दीतील तब्बल 7 जणांना झाली आहे. तर या 7 जणांच्या संपर्कातील 47 पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. खाकीवर्दीत या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या 15 वसाहतींकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.


मुंबईत सुरूवातीला सीएसटी रेल्वे स्थानकावरील एका पोलिस शिपायामध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला, त्याच्या दोन दिवसानंतरच वरळीच्या पोलिस वसाहतीतील राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. त्यानंतर आठवड्याभरापूर्वीच कुरार पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आल्यानंतर शासनाने पोलिसांच्या सुरक्षेकडे लक्ष केंद्रीत केले.नायगाव येथे कोरोना बाधित रुग्ण हा माल्डच्या बांगूरनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे कळाल्यानंतर शिपाई रहात असलेल्या नायगाव येथील तीन पोलिस वसाहत  पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सील केली. तर त्या शिपायासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पोलिसांनी विलगीकरण कक्षात ठेवले. सील केलेल्या इमारतीत रहात असलेल्या इतर पोलिस कुटुंबियांना घरपोच वस्तू देण्यात येणार असून त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक हवालदार आणि तीन सहाय्यक फौजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायगाव शहरातील मोठ्या पोलिस वसाहतींपैकी असून तिथे सुमारे 10 हजार पोलिस कर्मचारी व कुटुंबाचे सदस्य राहतात. तर या पूर्वीच मरोळ, वरळी, आणि बोरिवली पोलिस वसाहतीत संशयित रुग्ण आढळले होते. त्यामुळे या रोगाची लागन भविष्यात इतर  पोलिसांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना होऊ नये. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.


राज्यभरात आतापर्यंत पोलिस खात्यातील 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्या सात जणांच्या संपर्कातील इतर 47 जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश असून एक मुंबईचा तर दुसरा अधिकारी ठाण्याचा आहे. तर पाच पोलिस शिपाईक कोरोना बाधित असून त्यातील एक रेल्वे पोलिस दलातील आहे. तर विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 47 जणांमध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 42 पोलिस शिपाई आहेत. यातील बहुतांश पोलिस मुंबईतल्या विविध पोलिस वसाहतीत वास्तव्याला आहे. त्यामुळेच मुंबईतील 15 पोलीस वसाहतींवर विशेष लक्ष केंद्रीय करण्यात आले  आहे. यातील 3 पोलीस वसाहती सील करण्यात आल्या आहेत. विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेल्या वसाहतींमध्ये 8 वसाहती या पोलीस कर्मचा-यांच्या आहेत. तर4 वसाहती या पोलीस अधिका-यांच्या आहेत. अशा 12 वसाहतींवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. अशा वसाहतीत एक दिवसाआड वैद्यकीय पथक जाऊन येथील अधिकारी-कर्मचा-यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करीत आहेत. तर ज्यांना अशा प्रकारची लक्षणे वाटत आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. तसेच सर्व पोलीस वसाहतींचे गेट बंद केले असुन, येणा-या जाणा-यांची कसुन तपासणी सुरु आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा