अबू सालेमला फाशी होणार का? १६ जूनला फैसला!


अबू सालेमला फाशी होणार का? १६ जूनला फैसला!
SHARES

तब्बल २४ वर्षांपूर्वीचा तो दिवस, १२ मार्च १९९३, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला आणि मुंबई हादरली...पण मुंबईकरांना पुढे अजून भयानक अनुभव घ्यायचा होता. एक नाही, दोन नाही तर तब्बल १२ वेळा! पुढच्या दोन तासात मुंबईत विविध ठिकाणी लागोपाठ १२ बॉम्बस्फोट झाले आणि १२ मार्च १९९३ ची ती दुपार मुंबईकरांसाठीच नव्हे तर आख्ख्या भारतासाठी काळी दुपार ठरली. त्याच बॉम्बस्फोट प्रकरणाचा येत्या १६ जूनला विशेष टाडा कोर्टात निकाल दिला जाणार आहे.

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह उर्वरित सात आरोपींचा फैसला सोमवारी होणार आहे. या सात आरोपींमध्ये सालेम आणि मुस्तफा डोसासह अब्दुल कय्याम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्ला शेख यांचा समावेश आहे.

१२ मार्च १९९३ साली मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या १२ बॉम्बस्फोटांत तब्बल २५७ निष्पाप मुंबईकर मारले गेले होते. देशात आरडीएक्स स्फोटकांच्या मदतीने करण्यात आलेली स्फोटांची ही पहिलीच मालिका होती. या प्रकरणाचा हा दुसरा खटला सहा वर्षांहून अधिक काळ सुरु आहे. याआधी याच प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या याकूब मेमनला जुलै २०१५ साली फासावर लटकवण्यात आले होते, तर मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अद्यापही पाकिस्तानात लपून बसले आहेत.

पोर्तुगीजमधून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या अबू सालेमवर शस्त्रांची ने-आण करणे, तसेच अभिनेता संजय दत्तला एके ४७ रायफल दिल्याचा आरोप आहे, तर मुस्तफा डोसावर मुंबईत शस्त्रं उतरवून घेणे आणि कट रचण्याचा आरोप आहे. अबू सालेमला पोर्तुगीजमधून प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्याच्या प्रत्यार्पणाच्या वेळी पोर्तुगीज सरकारने भारतावर अनेक अटी घातल्या होत्या. त्यामुळे सालेमला नेमकी किती शिक्षा दिली जाते? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा