गुन्हा सिद्ध करण्यात एसीबी अपयशीच! ८३ टक्के लाचखोर सुटतात मोकाट!

प्रत्यक्ष लाच घेताना पकडूनही कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यात एसीबी आणि सरकारी वकिलांना अपयश येत असल्याने तब्बल ८३ टक्के लाचखोर निर्दोष सुटत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गुन्हा सिद्ध करण्यात एसीबी अपयशीच! ८३ टक्के लाचखोर सुटतात मोकाट!
SHARES

लाचखोरीची तक्रार झाल्यानंतर अँटी करप्शन विभागाचे (एसीबी) अधिकारी मोठ्या शिताफीने सापळा रचून भ्रष्ट अधिकारी वा कर्मचाऱ्यांना पकडतात. मात्र, प्रत्यक्ष लाच घेताना पकडूनही कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यात एसीबी आणि सरकारी वकिलांना अपयश येत असल्याने तब्बल ८३ टक्के लाचखोर निर्दोष सुटत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ परिक्षेत्रात १२ महिन्यांत ८३९ गुन्ह्यांची नोंद करत तब्बल ११०० आरोपींना बेड्या ठोकल्या. नोंदवण्यात आलेल्या ५४ प्रकरणांमध्ये फक्त ६२ आरोपींविरोधातच दोषारोपपत्र सिद्ध करण्यात एसीबीला यश आले आहे. तर ८३ टक्के गुन्ह्यांमध्ये अद्याप एसीबीला आरोपींविरोधात गुन्हे सिद्ध करता आले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात मुंबईच्या ३७ प्रकरणांपैकी फक्त ५ प्रकरणांमध्ये एसीबीला दोषारोपपत्र सिद्ध करण्यात यश आले आहे.


आरोपी का सुटतात?

 लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला पकडण्यासाठी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये असे रेकॉर्डिंग तांत्रिक कारणे देत रिजेक्ट केले जाते.

 विविध प्रकरणांमध्ये सापळा रचताना एकाच अधिकाऱ्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे 'प्रत्येक वेळी हाच अधिकारी का?' असा प्रश्न उपस्थित होऊन पुराव्याअभावी संशयित सुटतात.

आजही अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी पुरेशी तयारी न करताच, सापळे रचून कारवाई करतात. याचाच फायदा घेऊन आरोपींचे वकील न्यायालयात ही कारवाई कशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली, हे दाखवून आरोपींची निर्दोष मुक्तता करतात.


लाचखोरीचे सर्वाधिक गुन्हे पुण्यात

२०१५ मध्ये लाचखोरीचे सर्वाधिक १८१ गुन्हे पुणे विभागात दाखल झाले होते. त्याखालोखाल औरंगाबाद (१२६), नाशिक (११६), नागपूर (१०३), ठाणे (१०३), नांदेड (८९), अमरावती (८४) आणि मुंबई (३७) या विभागांचा क्रमांक लागतो.


भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यात तरुण आघाडीवर

भ्रष्टाचाराच्या नावाने एकीकडे ओरड सुरु असताना, आजची पिढी मात्र हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याच्या दिशेने पावले उचलताना दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या वर्षी आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींपैकी अर्ध्याहून अधिक तक्रारी या ३५ वर्षांहून कमी वयोगटातील तरुणांनी केल्याचे माहितीतून समोर आले आहे. दिवसेंदिवस तरुण तक्रारदारांचे प्रमाणही वाढत आहे.

३६ टक्के म्हणजेच ३६१ तक्रारदार हे ३५ हून कमी वयोगटातील आहेत. तर २८ टक्के(२७८) तक्रारदार ३६ ते ४५ वयोगटातील, ४६ ते ६० वयोगटातील १९ टक्के म्हणजेच १८९ तक्रारदार आहेत आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या४७ तक्रारदारांनी एसीबीकडे भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे वयोमर्यादा पाहिली, तर ५१ टक्के तक्रारदारांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे.


कशी दाखल कराल तक्रार?

भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवे अॅप सुरु केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही अवघ्या काही मिनिटांत तक्रार दाखल करु शकता. acbmaharashtra.net वर हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.
तसेच http://acbmaharashtra.gov.in/default.asp वर तुम्ही लॉग-इनही करु शकता.


याव्यतिरिक्त तक्रार करण्यासाठी...

ईमेल पाठवा – acbwebmail@mahapolice.gov.in
कॉल करा – १०६४ अथवा ०२२- २४९२१२१२
फॅक्स पाठवा – ०२२- २४९२२६१८
अथवा पत्र लिहूनही तुम्ही तुमची तक्रार दाखल करु शकता यासाठी – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ९१, सर पोचखानावाला रोड, वरळी पोलीस कॅम्प, वरळी मुंबई – ४०००३० या पत्त्यावर तुम्ही तुमची तक्रार पत्राने पाठवू शकता.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा