वडाळा - अनधिकृतपणे भर रस्त्यात वाहन दुरुस्तीचे दुकान थाटून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या गॅरेज मालकावर वडाळा टीटी पोलिसांनी धडक कारवाई केली. यामध्ये अनधिकृतपणे दुकान थाटणाऱ्या वडाळ्यातील 8 गॅरेज मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वडाळा (पू.) येथील शांतीनगर, ट्रक टर्मिनल, म्हाडा कॉलनी, विजयनगर, संगमनगर परिसरातील पदपथांवर अनधिकृतपणे गॅरेजचे दुकान थाटणाऱ्यांमुळे येथील रहिवाशांना पदपथांवरून चालताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याने रहिवासी हताश झाले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी वडाळा टीटी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली.
त्यानुसार वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी तात्काळ वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे गुन्हा वर्ग केला आणि बेकायदेशीरपणे रस्त्यावर चालणाऱ्या गॅरेजवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे रोजच्या त्रासातून मुक्तता मिळाल्याचं समाधान रहिवाशांनी व्यक्त केले आहे.