स्टंटबाजीला आवरा!

मुंबई - ट्रेन मध्ये स्टंट करणं म्हणजे कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो हे माहिती असूनही सर्रास स्टंट केले जातात. अशाच एका स्टंटचा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत लाल शर्ट घातलेला एक मुलगा दरवाजात लटकून स्टंट करतोय, तर त्याचा मित्र व्हीडिओ काढण्यात व्यस्त आहे. स्टंट करताना अचानक विजेच्या खांबाला तो आदळतो आणि थेट खाली पडतो. त्याच्या सोबतचे मित्र त्याच्या नावानं आरडाओरड करतात, पण तोवर उशीर झालेला असतो... या व्हीडिओ संदर्भात जीआरपीनं अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र व्हीडिओ मरिन लाईन्स आणि चर्नीरोड स्थानकादरम्यानचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या मुलाची ओळखही अद्याप पटलेली नाही. या व्हीडिओच्या आधारावर तपास सुरू असल्याची माहिती जीआरपीकडून देण्यात आलीये. व्हायरल झालेल्या या नव्या व्हीडिओने रेल्वेत स्टंट म्हणजे जीवाशी खेळ, ते पुन्हा एकदा दाखवून दिलंय.

Loading Comments