बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या ७ जणांना अटक

बेकायदा यंत्रणेद्वारे ही टोळी बहारिन, कुवेत, कतार, दुबई या आखाती देशांमध्ये संपर्क साधत होती. या टोळक्‍याचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, एटीएस तपास करत आहे.

बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या ७ जणांना अटक
SHARES

मुंबईत बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालविणाऱ्या ७ जणांच्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ६ ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद नसीम खान (२९), मोहम्मद सिबते अब्दुल कादर मर्चंट (३३), इम्तियाज शेख (३८), मंदार देवीदास आचरेकर (३६), समीर दरवेश (३०), मोहम्मद बाटलावाला (३६) व मोहम्मद हुसैन बरकत सय्यद (४०) यांना अटक केली आहे. अटक आरोपीकडून पोलिसांंनी सीमकार्ड, वायफाय राऊटर, लॅपटॉप आणि अ‍ॅन्टीना केबल असा एकूण ६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 


३७ कोटींचा महसूल बुडवला

बेकायदा यंत्रणेद्वारे ही टोळी बहारिन, कुवेत, कतार, दुबई या आखाती देशांमध्ये संपर्क साधत होती. या टोळक्‍याचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, एटीएस तपास करत आहे. भारतीय टेलिग्राफ कायदा व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपींविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशात दूरध्वनी करण्यासाठी तासाला १८ रुपये आकारले जातात. मात्र आरोपी फक्त ६ रुपये आकारत होते. या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजमधून परदेशांत होणाऱ्या संपर्काबाबत कोणतीही माहिती मिळवणं सुरक्षा यंत्रणांना शक्‍य होत नाही. हे टोळके व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) पद्धतीने स्थानिक मोबाइल क्रमांकावरून परदेशात संपर्क साधायचे. त्यांनी अशा पद्धतीने केंद्र सरकारचा ३७ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल बुडवल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. 


२१ ऑगस्टपर्यंत कोठडी

एटीएसने मशीद बंदर, डोंगरी, वरळी, गोवंडी, पनवेल, कल्याण या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली. या आरोपींकडून डेल कंपनीचा सर्व्हर, ९ सिमकार्ड बॉक्‍स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेस्कटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच व ११ मोबाइल अशी ६ लाख ५५ हजार रुपयांची सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली. न्यायालयाने सर्व आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा -

एजंट स्मिथची आहे तुमच्या खात्यातील पैशांवर नजर

सावधान! 'स्मार्ट टीव्ही' ठेवतोय तुमच्यावर 'वाॅच'




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा