बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न


बेस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न
SHARES

कुलाबा येथील बेस्ट भवन कार्यालयात अनोळखी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केल्याचे निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


कसं आलं उघडकीस?

कुलाब्यातील साबुसिद्धीकी रोडवरील न्यू म्युनसिपल बिल्डिंगमध्ये बेस्टचं कार्यालय आहे. या कार्यालयात काम करणारे भरत बोऱ्हाडे सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कार्यालयाला टाळं लावून गेले. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले असता त्यांना कार्यालयाचं कुलूप तुटलेेलं दिसलं.

तसंच कार्यालयातील सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या. कार्यालयातील कपाटे उघडीच होती. सर्वत्र कागदपत्रे खाली पडलेली होती. कार्यालयात चोरी झाल्याचा संशय आल्याने भरत बोऱ्हाडे यांनी इतर कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती देत पोलिसांना बोलावलं.


चोरीचा गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासात कार्यालयातून कोणतीही महत्वाची वस्तू अद्याप चोरीला गेल्याचं समोर आलेलं नाही. या प्रकरणी भरत बोऱ्हाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.



हेही वाचा-

गांजा तस्कर महिलांना एएनसीने ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीशी लग्न लावून अत्याचार करणाऱ्याला अटक



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा