अल्पवयीन मुलीशी लग्न लावून अत्याचार करणाऱ्याला अटक

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती लग्न लावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचाराबाबत मुलीने कुठेही वाचा करू नये यासाठी तरुणाने तिला डांबून ठेवलं होतं. मात्र मुलीने मोठ्या शिताफीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पोलिसांकडे मदत मागितल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे.

अल्पवयीन मुलीशी लग्न लावून अत्याचार करणाऱ्याला अटक
SHARES

14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती लग्न लावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला आणि तिच्या काकाला गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचाराबाबत मुलीने कुठेही वाचा करू नये यासाठी तरुणाने तिला डांबून ठेवलं होतं. मात्र मुलीने मोठ्या शिताफीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पोलिसांकडे मदत मागितल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे.


काय आहे प्रकार?

14 वर्षांची पीडित मुलगी ही मूळची पश्चिम बंगालच्या संबळपूर तालुक्यातील मालदा जिल्ह्यातील कुतुबगंज गावत राहणारी आहे. जुलै 2018 मध्ये मुलीच्या काकाने त्या अल्पवयीन मुलीचा विवाह 21 वर्षीय तरुणाशी करून दिला. हा तरुण वांद्रेच्या बेहरामनगर परिसरातील राहणारा आहे. तो बेगरचं काम करायचा. लग्नानंतर मुलीच्या मनाविरोधात जाऊन त्याने तिला मुंबईला त्याच्या घरी आणलं होतं.
कामावरून आल्यानंतर दारूच्या नशेत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्यास विरोध करताच त्याने तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करून तिला डांबून ठेवलं. 


आणि सुटका करून घेतली

रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने 22 ऑगस्ट रोजी तरुणाच्या घरातून पळ काढला. वांद्रे पश्चिम येथील एका रुग्णालयाबाहेर ती रडत असल्याचं पाहिल्यानंतर एका दुकानदाराने गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेत, तिच्याकडे विचारपूस केली असता मुलीला बंगाली व्यतिरिक्त कोणतीही भाषा येत नव्हती.


दोघांना अटक

पोलिसांनी बंगाली बोलणाऱ्या व्यक्तीचं म्हणणे ऐकून मुलीची समस्या जाणून घेतली. तर दुसरीकडे तरुणाने मुलीच्या काकाशी संपर्क साधून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार निर्मलनगर पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यावेळी दोघांनी पीडित मुलीचं वय पोलिसांना 19 असल्याचं सांगितलं. मुलीने दिलेल्या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काका आणि तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसानी काकाला बालविवाह कायद्यांतर्गत तर तरुणाला पोस्कोच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा