कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा जपून, अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकामं


कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करा जपून, अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकामं
SHARES

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीसाठी तुम्ही जर स्वत:च्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणार असाल तर जरा जपून. कोरोना लसीसाठी अनेक नागरिक बनावट अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करू लागले आहेत. या ठिकाणीही सायबर गुन्हेगारांनी घुसखोरी केली आहे. गुन्हेगारांनी लसीकरणाचाही गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. को-विनसारखेच बनावट संकेतस्थळ तयार करून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे. बनावट संकेतस्थळांचा मेसेज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा मेसेज वाचून जर तुम्ही को-विन अ‍ॅपमध्ये नोंदणी करणार असाल तर सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण बेफिकीर नोंदणीमुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. सायबर गुन्हेगार आपल्या गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यांवर डल्ला मारू शकतात. सरकारने याबाबत नागरिकांना अ‍ॅलर्ट केले आहे.

को-विनच्याच नावाने बनवलेल्या बनावट संकेतस्थळांवर अनेक नागरिकांनी आपली माहितीही अपलोड केली आहे. नागरिक या संकेतस्थळांवर आपले रजिस्ट्रेशन करून मोकळे झालेत. या नागरिकांना आता फसवणूक झाल्याची भिती हैराण करीत आहे. हे नागरिक बनावट संकेतस्थळावर नोंदवलेला स्वत:चा तपशील हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तपशील हटवण्याचा पर्यायच नसल्यामुळे अनेकांनी कपाळावर हात मारला आहे. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारच्या पीआयबी पथकाने दिशानिर्देश जारी केले आहेत.

बनावट संकेतस्थळावर एक लिंक शेअर करण्यात आली आहे. लिंकवर क्लिक करताच सरकारच्या पेजशी हुबेहुब असलेले दुसरे बनावट पेज खुले होते. त्यावर एक फॉर्मही उघडतो. ज्या फॉर्ममध्ये आपला तपशील भरण्यास सांगितले जाते. हा सगळा तपशील व ओटीपी नंबर मागवून घेतला जातो. त्यानंतर रुग्णालयांची अर्थात लसीकरण केंद्रांची नावेही दाखवली जाते. मात्र यातून आपली फसवणूक झालीय हे नागरिकांच्या उशिराने लक्षात येतेय.

केंद्र सरकारच्या पीआयबी पथकाने नागरिकांना बनावट संकेतस्थळांबाबत अ‍ॅलर्ट केले आहे. http://selfregistration.preprod.co-vin.in हे संकेतस्थळ सरकारच्या को-विन संकेतस्थळाशी मिळतेजुळते आहे. यावरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा संकेतस्थळांना बळी न पडता कोरोना लसीकरणाबाबत कुठलीही आवश्यक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे पीआयबी टीमने स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा