अति घाई, जीव घेई

मुंबई - रेल्वे स्टेशनवर मिनिटा-मिनिटाला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या सूचना आणि जनजागृती. याचा काही प्रवाशांवर परिणाम होताना दिसत नाहीये. कारण रेल्वे स्टेशनवरचे अपघात काही थांबले नाहीत. रोज कुणी ना कुणी ट्रेनमधून पडून जीव गमावल्याच्या घटना कानावर येत असतात. गेल्या आठवड्यातही 40 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा आकडा समोर आलाय. हा आकडा धक्कादायकच आहे. कुर्ला आणि घाटकोपरमध्ये घडलेल्या घटना पाहून तर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कुर्ला स्टेशनवर दोन मित्र गप्पांमध्ये व्यस्त होते. लोकल फलाटावर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घाईघाईनं या दोघांनी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांपैकी एक पाय घसरून पडला. सुदैवानं इतर प्रवाशांमुळे हा तरुण वाचला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसमधून घाटकोपरला उतरण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जिवावर बेतला. धावती गाडी सोडण्याच्या प्रयत्नात तो एक्स्प्रेस आणि रुळांमधल्या गॅपमध्ये पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत घाटकोपरमध्ये एका तरूणाने रेल्वे रूळाखाली येऊन आत्महत्या केली. अपघातांच्या वाढत्या घटना पाहून तर हेच म्हणावं लागेल की अति घाई तुमच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे साभांळून, घाई करू नका.

Loading Comments