बिल्किस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींची जन्मठेप कायम


बिल्किस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींची जन्मठेप कायम
SHARES

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब करत सर्व दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावत 7 जणांना निर्दोष सोडण्याचा निर्णयही मागे घेतला आहे. सोबतच गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) या प्रकरणाला 'दुर्मिळातील दुर्मिळ' (रेअरेस्ट ऑफ द रेअर) प्रकरण संबोधत जसवंत नाई, गोविंद नाई आणि शैलेश भट्ट यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळाली.

मुंबई उच्च न्यायालयाने 11 दोषी आरोपींची जन्मठेप शिक्षा कायम ठेवली असून, त्यात 5 पोलिसांचा समावेश आहे. यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. ज्या 7 जणांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते, त्यापैकी ५ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

गुजरातच्या दाहोड जिल्ह्यातील रंधीकपूर गावात 3 मार्च 2002 रोजी जवळपास 30-35 जणांच्या जमावाने 19 वर्षांच्या बिल्किस बानोवर बलात्कार केला होता. यावेळी ती 5 महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर जमावाने बिल्किस बानोच्या १४ नातेवाईकांना ठार मारले. त्यात तिची आई, दोन बहिणी, तीन वर्षांची मुलगी यांचा समावेश होता.

गुजरातमधील भयग्रस्त वातावरण बघता हा खटला मुंबईतील न्यायालयात चालवण्याचे आदेश तत्कालीन केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणाचा तपास करुन मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 

दोषींमध्ये जसवंत चतुर नाई, गोविंद नाई, नरेश रामलाल मोर्धिया, शैलेश चिमनलाल भट्ट, राधेश्याम भगवानदास शाह उर्फ लाला वकील, बिपिनचंद्र कन्हैयालाल जोशी, केशर खीमा वोहनिया, प्रदीप रमनलाल मोर्धिया, बाका खीमा वाहनिया, राजू बाबूलाल सोनी, मितेश चिमनलाल भट्ट, रमेश चंद्रा आणि सोम काया यांचा समावेश आहे. तर, पुरावे नष्ट केल्याचा आरोप असलेले डाॅक्टर दाम्पत्य अरूणकुमार प्रसाद आणि संगीता प्रसाद यांच्यासह नरपतसिंह रणछोड, इदरिस अब्दुल सैयद, भीखा रामजी पटेल, रामसिंह मितलीभाई भाभोर व बीएस भागोरा यांचा निर्दोष असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने फिरवला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा