गोवंडीत माणुसकी अन् विश्वासाचा खून


गोवंडीत माणुसकी अन् विश्वासाचा खून
SHARES

गोवंडी - आजच्या जमान्यातही माणुसकी जपणारं, विश्वास ठेवणारं कुणी सापडणंही कठीण झालंय. कुणी सापडलंच, तर त्याला काय मिळतं? तर फसवणूक... ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शादाब यांना नेमका याचाच अनुभव आलाय...
नेकी कर और दरिया में डाल, अशी हिंदीत म्हण आहे. गोवंडीतल्या व्यावसायिक शादाब यांचा चांगुलपणाही असाच मातीमोल झालाय. झालं असं की, एक 13 वर्षांचा मुलगा कार्यालयासमोरच भीक मागताना शादाब यांना दिसला. त्यांनी या मुलाला बोलावून भीक का मागतोस, असं त्याला विचारलं. त्यावर या जगात माझं कुणीच नाही, अनाथ असल्यामुळे भीक मागतो असं उत्तर या मुलानं दिलं. त्यामुळे हृदय द्रवलेल्या शादाब यांनी या मुलाला आसरा देण्याचं ठरवलं. त्याला खाऊ-पिऊ घातलं आणि कार्यालयातच राहण्याचीही व्यवस्था केली. हा मुलगा मग कधीही कार्यालयात जा-ये करू लागला.
रविवारी संध्याकाळी शादाब यांना एका पार्टीकडून दीड लाख रुपये मिळाले. कार्यालयातल्या लॉकरमध्ये हे पैसे ठेवून ते घरी गेले. मात्र सोमवारी सकाळी कार्यालयात गेल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण हे पैसे आणि त्यांनी आसरा दिलेला अनाथ मुलगा असे दोघेही गायब होते. अखेर शादाब यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक हुसैन जतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून तपास सुरू केला आहे.
तपास होईल, कदाचित हा मुलगा सापडेलही. पण यापुढे शादाब कधी कुणाला माणुसकी दाखवतील का, कुणावर विश्वास टाकतील का, हा प्रश्न मात्र कुठल्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करत राहील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा