ई-मेल हॅक करून सायबर चोरटे तुमचीही करू शकतात 'अशी' फसवणूक!

सायबर गुन्ह्यांचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे सरकार आॅनलाईन व्यवहारांसाठी आग्रह करत असताना सायबर सुरक्षेबाबत उदासीनता दिसून येत आहे. मुंबईत विविध मार्गाने सायबर चोरटे सर्वसामान्यांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करत आहेत

ई-मेल हॅक करून सायबर चोरटे तुमचीही करू शकतात 'अशी' फसवणूक!
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सायबर चोरट्यांचा सुळसुळाट झाला अाहे. नागरिकांचे ईमेल हॅक करून त्याच्या जवळच्या व्यक्तींकडे पैशांची मदत असल्याचे मेल पाठवून  लुबाडण्याचा नवीनच फंडा या चोरट्यांनी आता सुरू केला आहे. नुकताच असा एक प्रकार परळ येथील राजेश दराडे (४९) यांच्यासोबत घडला अाहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.


पैशांच्या मदतीसाठी मेल

परळ येथे राहणारे राजेश दराडे हे मूळचे लातूरचे रहिवाशी आहेत. लातूरमधील वैष्णवी हाॅस्पिटल आणि इंन्डोस्कोपी सेंटरचे परळ येथे काॅलेज ऑफ फिजीशन व सर्जन नावाने काॅलेज आहे. या ठिकाणी राजेश हे निबंधक म्हणून कार्यरत आहेत. ९ आॅक्टोबर रोजी दराडे काॅलेजमध्ये असताना त्यांचा मित्र गणेश कुर्हाडे यांचा लातूरहून फोन आला. त्यावेळी गणेशने काही अडचणीत आहेस का ? असं विचारून राजेश वापरत असलेल्या daraderv@yahoo.co.in या ईमेल आयडीहून पैशांची मदत हवी असल्याचा मेल आला असल्याचे सांगितले. त्या मेलमध्ये अकाऊंट नंबरही पाठवण्यात आला होता.  यावेळी राजेश यांनी असा कोणताही ई-मेल अापण पाठवला नसल्याचं सांगितलं. पुरावा म्हणून गणेशने ईमेलचे स्क्रिन शाॅटही पाठवले. 


ईमेलमध्ये अकाऊंट नंबर

राजेश यांनी त्यांचा ईमेल पाहिला असता, त्यांना त्यामध्ये सुनिल चटर्जी या नावाने अॅक्सीस बँकेचा खाते क्रमांक 917010056543399 व आयएफएससी कोड 0002617 तसंच उलबेरीया शाखा अशी माहिती देण्यात अाल्याचं अाढळलं. त्यानंतर अनेक मित्रांचे फोन आल्यानंतर राजेश यांनी आपला ईमेल आयडी हॅक केला असून पैशांची गरज नसल्याचं सर्वांना सांगितलं. तात्काळ राजेश यांनी ईमेलचा पासवर्ड बसलला. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राजेश यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पोलिस तपास करत आहेत. 


पोलिसांचं आवाहन

सायबर गुन्ह्यांचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच आहे.  एकीकडे सरकार आॅनलाईन व्यवहारांसाठी आग्रह करत असताना सायबर सुरक्षेबाबत उदासीनता दिसून येत आहे. मुंबईत विविध मार्गाने सायबर चोरटे सर्वसामान्यांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे गोपनीय माहितीबाबत कुणासोबत चर्चा करू नये. तसंच वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 


सायबर क्राइम रोखण्यासाठी उपाय

  • कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याचा मोह टाळावा.
  •  इंटरनेटवरील अॅक्टिव्हिटी जाहीर किंवा शेअर करू नये.
  •  स्पॅम मेलला उत्तर देण्याचे अथवा त्यांच्या साइटसना भेट देण्याचे टाळावेच.
  •  नेटवरील माहिती अथवा मोबाइल क्रमांक याबद्दल चौकशी केल्याशिवाय गुंतवणूक करू नये.
  • मोबाइलवर येणाऱ्या बल्क मेसेजमधून सहजतेने पैसा उकळण्यात येतो, हे लक्षात ठेवावे.
  • पासवर्ड अथवा खाते क्रमांक याबाबत गोपनीयता बाळगावी.
  •  आपल्या घरातील तरुण मुले इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करतात, याबाबत पालकांनी जागरूक असावे
  •  सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा



हेही वाचा - 

खड्ड्यांमुळे नवजात बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरवलं

डीसीपींनींच रंगेहाथ पकडलं लाचखोर पोलिसाला!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा