धक्कादायक! अंधेरीतील 'त्या' दरोड्यामागे पोलिस शिपायाचा हात


धक्कादायक!  अंधेरीतील 'त्या' दरोड्यामागे पोलिस शिपायाचा हात
SHARES
ऐकीकडे मुंबईसह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत असताना, अंधेरीत माञ एका शिपायाने खात्याला मान खाली घालायला लावणारे कृत्य केले आहे.  झटपट श्रींमतीसाठी एका शिपायाने भूरट्या चोरांच्या  मदतीने अंधेरी एमआयडीसीतील मौल्यवान दागिने बनवणाऱ्या कारखान्यावर दरोडा टाकल्याचे पुढे आले आहे. या गुन्ह्यात  एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने  सात जणांना अटक केली आहे. चौकशीत या सर्वामागे एमआयडीसी पोलिस ठाण्यात काम करून बदली झालेल्या पोलिस शिपायाचा सहभाग असल्याचे पुढे आल्यानंतर तपास अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

मुंबईतल्या अंधेरी एमआयडीसी परिसरात हा मौल्यवान दागिने बनवणारा कारखाना असून लाँकडाऊनमुळे सध्या हा कारखाना बंद होता. दरम्यान  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यात अनोळखि व्यक्तींनी कारखान्याचे छप्पर तोडून कोट्यावधी रुपयांची चोरी केली. लाँकडाऊन असल्यामुळे जवळपास पंधरा दिवस मालक कारखान्याकडे न फिरकल्यामुळे त्याला याची माहितीच पडली नाही. दरम्यान 21 एप्रिल रोजी मालक कारखान्यात काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी कारखान्यातून कोट्यावधी रुपयाचे सोने तिजोरी कापून चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. परिसरात आधीच तणावाचे वातावरण असून त्यात हा प्रकार घडल्यामुळे तपासाची चक्र वेगाने फिरली. 

कारखान्यात सीसीटिव्ही होता. माञ नेमकी चोरी कुठल्या तारखेला झाली हे पाहण्यासाठी महिनाभराचे सीसीटिव्ही पाहण्यात वेळ दवडायचा नव्हता.  लाँकडाऊन असल्यामुळे कारखाना बंद होता. त्यात चोरट्यांनी ग्राइंडरच्या मदतीने तिजोरी कापली होती. त्यामुळे नक्कीच विजेचे युनिट जास्त गेले असणार असा तर्क लावत पोलिसांनी मीटर तपासला. त्यावेळी पोलिसांना 6 एप्रिलला विजेचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी 6 तारखेचे सीसीटिव्ही तपासले असता. त्यात चोरांचा अस्पष्ठ हालचाल दिसत होती.


चोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कारखाना परिसरातील सीसीटिव्ही तपासले. त्यावेळी एक गाडी त्या परिसरात वारंवार फिरताना संशयित पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी त्या गाडीच्या नंबरद्वारे एका संशिताला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्यातील आरोपी विपुल चांबरिया, दिमन चौहान, मुन्नाप्रसाद खैरवार, शंकर येशु, राजेश मारपक्का, विकास चनवादी यांची नाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करत चौकशी केली. त्यांच्या चौकशीत या दरोड्याचा मास्टर प्लाँन हा वर्सोवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई संतोष राठोड याने आखला असल्याचे कळाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे संतोषला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता. सुरूवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. संतोषच्या खात्यातील पोलिस मिञांकडे चौकशी केल्यानंतर त्याने काही दिवसांपूर्वी  लाखोंचे मौल्यवान दागिने ठेवायला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी संतोषच्या मिञांकडून  चोरीतील 80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे.  तपासात संतोष पूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यातच कार्यरत होता. एका वर्षापूर्वीच त्याची वर्सोवा येथे बदली झाली असल्याचे तपासात पुढे आले. तो पूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्यामुळे त्याला त्या परिसराची इंतभूत माहिती होती. पुढे झटपट श्रीमंत होण्यासाठीच या चोरांच्या मदतीने संतोषने हा कट रचल्याचे पुढे आलॆ. लवकरच संतोषला सेवेतून बडतर्फ केले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा