सिंचन घोटाळ्यातील आरोपीची गोळी झाडून आत्महत्या


सिंचन घोटाळ्यातील आरोपीची गोळी झाडून आत्महत्या
SHARES

राज्यभर गाजलेल्या विदर्भातील सिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रर्वतक जिगर प्रविण ठक्कर यांनी मंगळवारी मरीन ड्राइव्ह इथं रिव्हाल्वरने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. अधिवेशन सुरू असताना ठक्कर यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. ठक्कर यांनी आत्महत्या का केली? याचा मरीन ड्राइव्ह पोलिस शोध घेत आहेत.


गैरव्यवहाराबद्दल गुन्ह्याची नोंद

डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रविण नाथलाल ठक्कर यांचा जिगर ठक्कर (४१) हा मुलगा आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेदरम्यान गैरव्यवहार झाले होते.


कुठले आरोप?

गोसेखुर्द डावा कालवा मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्यपणे मूल्यवाढ करणे, अवैधपणे निविदेतील बदलाला मंजुरी देणे, कंत्राटदारास गैरमार्गाने निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या आरोपाखाली कंत्राटदार आर. जे. शाह अॅण्ड कंपनी लिमिटेड आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रविण ठक्कर, जिगर ठक्कर आणि विशाल ठक्कर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.


नेमकं काय झालं?

घाटकोपर परिसरात राहणारे जिगर ठक्कर यांचं व्यावसायात मोठं नुकसान झाल्यामुळे ते मानसिक तणावात होते. दरम्यान मंगळवारी जिगर यांनी त्यांचा चालक सुनिल सिंग याला कार मरीन ड्राइव्हच्या दिशेने घेण्यास सांगितली. सायंकाळी ७ वाजेची वेळ असल्याने मरीन ड्राइव्ह बिचवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जिगर यांनी मरीन प्लाझा हाॅटेल जवळ आल्यानंतर चालकाला कार बाजूला थांबवण्यास सांगून फोनवर महत्वाचं बोलायचं असल्याचं सांगून कारचालक सुनिलला बाहेर जाण्यास सांगितलं.


रुग्णालयात पोहोचण्याआधीच

सुनिल बाहेर गेल्यानंतर जिगर यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हाल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गाडीतून आलेल्या गोळीच्या आवाजामुळे मरीन ड्राइव्ह परिसरातील नागरिकांनी आणि सुनिलने कराच्या दिशेने धाव घेतली. जिगर यांनी आत्महत्या केल्याचं पाहून सुनिलने तातडीने त्यांना जीटी रुग्णालयात नेले. मात्र त्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येच्या मूळ कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.पोलिसांना गाडीत सिंचन घोट्ळ्याची कागदपत्रेही सापडली आहेत.


काय आहे सिंचन घोटाळा?

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ७२ हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असल्याचं म्हटलं जातं. विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांची किंमत ६,६७२ कोटी रुपयांवरून थेट २६,६७२ कोटी रुपयांवर पोहोचली. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही दरवाढ केली. ही दरवाढ ठेकेदारांच्या दबावाखाली झाल्याचा आरोप करण्यात येतो.


किंमतीत ३०० पट वाढ

ही थक्क करणारी किंमत वाढ मूळ प्रकल्पाच्या ३०० पट आहे, किंमत वाढीच्या जास्तीच्या २०,००० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला फक्त ३ महिन्यांमध्ये परवानगी मिळाली. जून, जुलै आणि ऑगस्ट २००९ मध्ये वाढीव खर्चाला कोणत्याही हरकतीशिवाय परवानगी देण्यात आली. व्हीआयडीसी म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही भाववाढ मंजूर करून घेण्यासाठी बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजुरांवरील खर्च आणि इंजिनीअरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ ही कारणे दिली.



हेही वाचा-

तटकरेंच्या अडचणीत वाढ? सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा