लाँकडाऊन उल्लघंन प्रकरणी आतापर्यंत १ लाख १४ हजार गुन्हे दाखल


लाँकडाऊन उल्लघंन प्रकरणी आतापर्यंत १ लाख १४ हजार गुन्हे दाखल
SHARES
 राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ३५ लाख ३९ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला,अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २४ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,१४,२४७ गुन्हे नोंद झाले असून २२,८६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या. त्यात ८३० व्यक्तींना ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मदत
पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात  या १०० नंबर वर  प्रचंड भडिमार झाला . ९५,९११ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,३४,४९४ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,१५,५९१ पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७१,०४५ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 
 
पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष
  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील १० पोलिस व १ अधिकारी असे एकूण  ११, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व  अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या ९० पोलीस अधिकारी व ३५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह  असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 
   राज्यात एकूण १३५३  रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ८२,४२२  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉक डाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा