Lockdown : जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची मुंबईच्या रस्त्यावर गर्दी


Lockdown : जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची मुंबईच्या रस्त्यावर गर्दी
SHARES
राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला असून त्यात अनेक अटी-शर्थी शिथील करण्यात आल्या  आहेत. तरी काही ठिकाणी नागरीक खाजगी कार व दुचाकी घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम, पूर्व द्रूतगतीमार्गांवर मंगळवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. त्यातही विशेष करून मुंबई बाहेर जाणा-या व्यक्तींची गर्दी अधिक दिसून आली.

राज्यात लाँकडाऊन मधील अटी आणि शर्ती शिथील केल्या आहेत.  त्यातच पोलिसांनी ही कटेंन्मेंट झोन वगळता, बाकीच्यांना ईपास देऊ केल्याने सोमवारपासूनच मुंबईतील रस्त्यावर कार आणि दुचाकी गाड्यांची गर्दी  वाढलेली होती. पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर मुंबई बाहेर जाणा-या कार व दुचाकींची अधिक दिसून आली. तर  बिनकामाचे बाहेर पडण्यावर चाप बसवण्यासाठी पोलिसही ठिक ठिकाणी वाहनांची तपासणी करत  होते. पश्चिम द्रुतगती मार्गावर दुपारी बोरीवलीच्या दिशेने जाणा-या मार्गिकेवर गर्दी पहायला मिळाली. विशेष करून अंधेरी व विलेपार्ले उड्डाणपूल परिसरात वाहनांची गर्दी दिसली. या परिसरात  पोलिसांनीही विविध ठिकाणी नाकाबंदी केली असून जीवनावश्यक सेवेचे पासची तपासणी केली जात आहे. याशिवाय दुचाकीवरून एकाहून जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 


बिन कामाचे वाहन घेऊन बाहेर पडलेल्या 1056 जणांवर संचारबंदीचा नियम तोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधीक गुन्हे उत्तर मुंबईत(330), तर त्याच्या पाठोपाठ पूर्व मुंबईत 209 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी मुंबईत दोन लाख 9 हजार चालान जारी करण्यात आले आहेत. त्यात साडे नऊ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवण्याप्रकरणी 73 हजार 735 चालान, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 36 हजार 248 चालान, अधिकृत परवाना सादर न केल्याप्रकरणी11 हजार 611 चालान, विना चालक परवाना गाडी चालवल्याप्रकरणी 6 हजार 354 चालान जारी करण्यात आले आहेत. असे एकूण दोन लाख 9 हजार 18 चालान लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जारी करण्यात आले आहेत. त्यातील दंडाची रक्कम 9कोटी 43 लाख 46 हजार 200 रुपये एवढी आहे. याशिवाय अवैधरित्या वाहतुक करणा-या टॅक्सी रिक्षांवरही मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा