पोलिसानेच केला पीडितेवर बलात्कार

देशातल्या जनतेचं रक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्यानंच असं कृत्य करणं लाजिरवाणी बाब आहे. न्याय मिळेल या आशेनं आपण आपल्या तक्रार घेऊन पोलिसांकडे जातो. पण जर पोलिसच शोषण करू लागले मग जनतेनं जायचं तरी कुठे?

SHARE

विवाहितेला खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत, तिच्यावर पोलिस शिपायानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पवईत उघडकीस आला आहे. मधुकर आव्हाड (४८) असं या अटक आरोपीचं नाव आहे. मधुकरला शनिवारी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


महिलेनं केली चाँकलेटची चोरी

भांडुप परिसरात राहणारी पीडित महिला एका विमा कंपनीत कामाला आहे. 6 जुलै रोजी ती पवईच्या डी मार्ट परिसरात खरेदी करण्यासाठी गेली. खरेदी करताना तिनं चॉकलेट्सची दहा पाकिटं चोरी करुन तिच्या पर्समध्ये लपवून ठेवली होती. सर्व सामान घेतल्यानंतर तिनं बिलाची रक्कम दिली. पण पर्समध्ये ठेवलेल्या चॉकलेटचे पैसे न देताच डी मार्टमधून बाहेर पडली. ही बाब सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्यानं तिला रोखलं. तिने खरेदी केलेल्या सामानाची पाहणी करून त्या महिलेला डी मार्टच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यावेळी तिनं त्या चॉकलेटचे पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र तोपर्यंत एका सिक्युरिटी गार्डनं पोलिसांना फोन केला असल्यामुळे पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या टिममध्ये मधुकर आव्हाड नावाचा शिपाई देखील होता. त्यावेळी महिलेनं चोरीची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर माफीनामा घेऊन तिचे नाव, पत्ता, मोबाईल घेऊन तिला सोडून देण्यात आले होते.


पीडितेला भेटायला बोलवून अत्याचार

7 जुलै रोजी पीडित महिला कामावर असताना तिला मधुकरनं फोन केला. त्यानं तिला चोरीचं प्रकरण संपलं नाही, तुमचा माफीनामा अद्याप त्यांच्याकडे आहे. प्रकरण पूर्णपणे संपवायचे असेल तर भेटायला या, असा आग्रह आव्हाडनं केला. यानंतर ही महिला प्रचंड मानसिक तणावात होती. 8 जुलैला पीडित महिला प्रकरण मिटवण्याच्या उद्देशानं आव्हाडला भेटण्यासाठी पवई इथल्या एलएनटी गेटजवळ गेली. त्यावेळी मधुकर आव्हाडनं तिला बाईकवर बसण्यास जबरदस्ती केली. त्यानं तिला आरे कॉलनीतील एका हॉटेलमध्ये नेलं. त्यानंतर तिला शारिरीक संबध न ठेवल्यास त्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर वेळोवेळी आव्हाडनं पीडितेला बोलवून तिच्यावर अत्याचार केले.


पीडितेची पोलिस विरोधात तक्रार

रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर ते दोघेही पवई पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. आव्हाडला शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं या गुन्ह्याची कबुली देताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला बलात्काराच्या याच गुन्ह्यात रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी हॉलि़डे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई देखील होणार आहे.हेही वाचा

39 कोटिंच्या कोकेनसह परदेशी तस्कर अटकेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या