सिलेंडर स्फोटात रे रोडमधील 20 झोपड्या जळून खाक

 Mumbai
सिलेंडर स्फोटात रे रोडमधील 20 झोपड्या जळून खाक
Mumbai  -  

रे रोड येथील दारूखाना लकडा बंदर मधील साईकृपा रहिवासी संघ झोपडपट्टीतील बंद घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने तब्बल 20 झोपड्या जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि शिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन तासांत ही आग नियंत्रणात आणली.विदेशी नावाच्या 35 वर्षीय इसमाच्या घरात कुणीही नसताना ही आग लागली. तो कामाला जाण्यापूर्वी गॅस बंद करण्यास विसरला. त्यामुळे, गॅसगळती होऊन स्फोट झाला आणि आग लागली. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या घरातील झोपडीधारक बाहेर पळाले. दरम्यान, शेजारील घरांमध्येही आग पसरल्याने तिथे असलेल्या तीन कमर्शियल सिलेंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे, क्षणातच सर्वत्र आग पसरून होत्याचे नव्हते झाले. जवळपासच्या घरातील झोपडीधारकांनी विद्युत मीटर आणि सिलेंडर वेळीच बंद केल्याने परिस्थिती अधिक बिघडली नाही. मात्र, या घटनेत 20 झोपड्या जळून खाक झाल्या असून, चार सिलेंडरच नव्हे तर अनेकांच्या घरातील स्टोव्ह, गॅस स्टोव्ह हे देखील या स्फोटात फुटले आहेत. शाळेला सुट्टी असली तरी मुलांच्या शाळेचे सर्व साहित्य, महत्वाची कागदपत्र, पैसे, दागिने आदी महत्वाच्या वस्तू यात जळून खाक झाल्या आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे 20 संसार उध्वस्त झाले असून, सर्वांच्याच राहण्याचा तसेच खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे स्थानिक रहिवासी अरुणा यादव यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच भायखळा, शिवडी आणि बीपीटी अग्निशमन दलाचे जवान तसेच 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेशी संबंधित असलेल्या झोपडीधारकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सुधीर नावगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवडी

Loading Comments